- ‘सातासमुद्रापार मराठी भाषेचा प्रसार’ विषयावर कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेकनॉलॉजी येथे मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती निमित्त “सातासमुद्रापार मराठी भाषेचा प्रसार” या विषयावर आयोजित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून श्वेता करंदीकर व विभा लाड या संयुक्त अरब अमिरात येथून उपस्थित होत्या. हा कार्यक्रम सांस्कृतिक व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे सिनेट सदस्य व संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मराठी साहित्याच्या वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या भव्य ग्रंथप्रदर्शनाच्या उदघाटनाने झाली. कथा-कादंबऱ्या, ऐतिहासिक, धार्मिक, वैज्ञानिक, राजकीय तसेच व्यक्तिमत्त्व विकासावरील विविध ग्रंथांचे प्रदर्शन पाहताना प्रमुख पाहुण्यांनी विशेष कौतुक व्यक्त केले. सौ. करंदीकर व सौ. लाड यांनी “जितके जुने ग्रंथ तितकी त्यांची जपणूक आणि वाचनाची परंपरा अधिक दृढ दिसते,” असे सांगत मराठी वाचनसंस्कृतीच्या सातत्याचे कौतुक केले.
प्राचार्य डॉ. शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेची समृद्ध परंपरा आणि तिच्या जतन-संवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. कुसुमाग्रजांच्या साहित्याचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासून मराठी भाषेशी अभिमानाचे नाते दृढ करावे, असे आवाहन केले. “मराठी ही केवळ भाषा नाही तर आपली ओळख, संस्कार आणि विचारांची ताकद आहे,” असे सांगत प्राचार्य डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मराठी वाचनाची सवय लावून साहित्याशी जिव्हाळ्याचे नाते जोडण्याचे प्रेरणादायी आवाहन केले.
ग्रंथ तुमच्या दारी” : परदेशातील मराठीचा सेतू याबद्दल प्रमुख पाहुण्या सौ. श्वेता करंदीकर यांनी परदेशात राबविलेल्या “ग्रंथ तुमच्या दारी” या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सुमारे ५८ ग्रंथपेट्या तयार केल्या आहेत प्रत्येक पेटीत सुमारे २५ मराठी ग्रंथ तरुण, किशोरवयीन आणि कुटुंबांसाठी वेगवेगळे संच या उपक्रमामुळे परदेशातील मराठी कुटुंबांना वाचनाची सवय लागून मुलांमध्ये भाषेची गोडी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी केवळ बोलण्यापुरती नाही तर वाचनातून संस्कार घडवणारी भाषा आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सातासमुद्रापार मराठी संस्कृतीचा प्रसार करतांना सौ. विभा लाड यांनी यूएईमध्ये मराठी सण, वाचनगट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मुलांसाठी कथा सत्रे आयोजित करून मराठी भाषा व संस्कृती कशी जपली जाते याचे प्रेरणादायी उदाहरण मांडले. परदेशात राहूनही मराठी ओळख जपण्याची भावना अधिक दृढ होते, असे त्यांनी सांगितले. तर लोकपरंपरेचा रंगतदार प्रवास प्रा. सोनाली म्हरसाळकर यांनी लोककला, पोवाडे, लोकवाद्ये, वासुदेवाची वारी आणि मराठी गीतांच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारशाची जाणीव करून दिली.
यानंतर विद्यार्थ्यांची प्रभावी सादरीकरणे घेण्यात आली यामध्ये एमबीए शाखेतील जयेश सूर्यवंशी यांनी कुसुमाग्रज व वाचनाचे महत्त्व यावर विचारमंथन केले.तसेच प्रज्वल पवार, वैष्णवी कासार, संध्या सूर्यवंशी, स्वप्नील बनकर कस्तुरी जाधव व स्नेहल सांगळे यांनी भाषणे व कवितांद्वारे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण रंगत आणली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. रवींद्र नाईकवाडे यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रियंका ठाकूर यांनी करून दिला. उपप्राचार्य डॉ. गणेश तेलतुंबडे यांनी आपल्या मनोगतात कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच जागतिक स्तरावरील इंग्रजी ग्रंथांचे मराठी भाषेत भाषांतर करून ज्ञानविस्ताराबरोबरच स्वावलंबी अर्थार्जनाच्या संधी निर्माण कराव्यात, असेही त्यांनी सुचविले. शेवटी उपस्थित मान्यवर, आयोजक आणि विद्यार्थ्यांचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सलमान पठाण, ग्रंथपाल रुपाली शार्दूल, ग्रंथालय लिपिक वृषणता जाधव व सुनील पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विविध शाखेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments are closed.