- गरज नसताना इंधन टाक्या पूर्णपणे भरल्या; टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवले
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे कमी दृश्यमानता हे कारण सांगितले जात असतानाच आ. रोहित पवार यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. वैमानिक कॅप्टन सुमित कपूर याने दृश्यमानता कमी असूनही विमान माघारी न फिरवता खाली उतरवले तसेच त्यानेच विमानाचा स्फोट करण्यासाठी विमान मुद्दाम खाली आदळल्याचा गंभीर आरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
आ. पवार म्हणाले, मुंबई-बारामती प्रवासासाठी फार इंधनाची गरज नसताना दादांच्या विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरण्यात आल्या होत्या. हे विमान बारामतीहून हैदराबादला जाणार होते. तिथे विमानात पुन्हा इंधन भरता आले असते. मात्र, हे विमान सुरतवरुन मुंबईला येत असतानाच त्याच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या. अपघाताच्या वेळी विमानात तीन ते साडेतीन हजार लीटर इंधन होते. एवढेच नव्हे तर विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवले होते. या सगळ्यात पायलटचा वापर करुन अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवण्यात आला, असे आम्हाला वाटते. विमानात जास्त इंधन असेल तर मोठा स्फोट होईल, हा आमचा संशय खरा ठरताना दिसत आहे.
केवळ 3500 दृश्यमानता..
विमानाच्या लँडिगसाठी 5000 इतकी दृश्यमानता लागत असताना बारामतीत त्यावेळी 3500 इतकीच दृश्यमानता होती. मुळात मुंबईतून उड्डाण करतानाच दृश्यमानता कमी होती. तरीही विमानाच्या उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली. यानंतरही विमानाने उड्डाण केले तरी ते बारामतीत लँड करायला नव्हते पाहिजे. त्यामुळे या अपघाताबाबत घातपाताचा संशय अधिक बळावतो, असे रोहित पवार यांनी म्हटले. पवार यांनी व्हीएसआर या विमानसेवा देणाऱ्या कंपनीवरही संशय व्यक्त केला आहे. कंपनीचा गोपी नामक हँडलर मुंबईत बसून फ्लाईट प्लॅनमध्ये फेरफार करु शकतो. आपल्या माहितीनुसार, सध्या तपास सुरु असून व्हीएसआर कंपनीकडून कागदपत्रे मिळण्यात विलंब होत आहे. कारण, व्हीएसआर कंपनीकडून सध्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीवरुन फ्लाईट प्लॅन आल्यानंतर हँडलर गोपीने त्यामध्ये बदल केले असावेत. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करताना त्यावेळी पाठवण्यात आलेले ई-मेल तपासावेत, असे आ. पवार म्हणाले.
Comments are closed.