- हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्षेपाला प्रत्युत्तर
** एनजीएन न्यूज नेटवर्क
मालेगाव : उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद यांची निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावल्याने राज्यभर गोंधळ उडाला आहे. या कृतीला भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेत आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर शान-ए-हिंद यांनी आपल्या कृतीचे समर्थन करीत टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
उपमहापौर म्हणाल्या, मी टिपू सुलतान यांचा दालनात फोटो लावल्याने त्यांच्या महान कार्याचा अनेकांना उलगडा झाला. टिपू सुलतान यांच्या सैन्यातील अनेक प्रमुख ब्राह्मण समाजाचे होते. टिपू सुलतान यांचे छायाचित्र संविधानात आहे, याची भाजपला जाणच नाही. संविधानात ज्यांचे छायाचित्र आहे तो हटविण्याचा अधिकार भाजप व इतरांना कोणी दिला, असा सावल करत शान ए हिंद यांनी हिंदुत्ववादी संघटनांचा विरोधाचा मुद्दा खोडण्याचा प्रयत्न केला आहे. या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानी तुलना थेट शिवाजी महाराजांशी करत, ते इंग्रजांविरुद्ध लढल्याची माहितीचे वक्तव्य केले. त्यावरुन, सत्ताधारी भाजपमधील नेत्यांनी सपकाळ यांना लक्ष्य केले.
संविधानात टिपू सुलतान यांचा उल्लेख आहे. मग यांच्याविषयी आंदोलन करणाऱ्यांना परवानगी कशी मिळू शकते, असे म्हणत यासंदर्भातील आंदोलनावरही शान-ए-हिंद यांनी टीका केली आहे. मी एक ओबीसी वर्गातून आलेली आहे म्हणून मला टार्गेट केले जात असल्याचा ‘शान ए हिंद ‘ यांनी आरोप केला आहे.
छायाचित्र पुन्हा लावणार
दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचे छायाचित्र पुन्हा लावण्यात येईल, असे वक्तव्य त्यांनी एका स्वागत समारंभात केले. या वक्तव्यामुळे मालेगाव शहरात पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Comments are closed.