नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या ५५० हून अधिक विद्यार्थ्यांनी पिंपळगाव बसवंत येथे भारतातील पहिले ‘बसवंत हनी बी पार्क अॅण्ड अॅग्रो टुरिझम’ केंद्राला भेट दिली. या सहलीत शिक्षण आणि मनोरंजनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांना मधमाश्या आणि ग्रामीण संस्कृती यांचा जवळून परिचय झाला.
विद्यार्थ्यांनी ‘बी म्युझियम’ला भेट देत मधमाश्यांच्या विविध प्रजाती आणि त्यांच्या पर्यावरणातील भूमिकेवरील माहितीपट पाहिला. मार्गदर्शकांनी प्रत्यक्ष मधमाशी पालन आणि मध संकलनाचे प्रात्यक्षिक दाखवले. ‘सावरगाव’ या आदर्श गावात विद्यार्थ्यांना ‘१२ बलुतेदार’ व्यवस्था आणि पारंपरिक ग्रामीण जीवनशैलीची माहिती मिळाली. सहलीदरम्यान ट्रॅक्टर राईड, झिप लाईन आणि चॉकलेट फॅक्टरी भेट यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
शिक्षकांनी सांगितले, “अशा प्रत्यक्ष अनुभवांमुळे मुलांना जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धन यांचे ज्ञान पाठ्यपुस्तकांपेक्षा अधिक प्रभावीपणे मिळते.” या शैक्षणिक सहलीचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका मिस मंजू पाटील आणि पर्यवेक्षिका शीतल चिंचोलिकर यांनी केले.
Comments are closed.