NGN News
Latest Marathi News

अजितदादा पवार विमान अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

  • बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन

सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क

माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातासंदर्भात गंभीर संशय व्यक्त करत हा अपघात केवळ तांत्रिक चूक नसून त्यामागे घातपात असण्याची दाट शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) मार्फत तसेच व्हीएसआर या विमान कंपनीची ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) सोबतच इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

यासंदर्भात आज तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. यावेळी बोलताना माजी आमदार संजय चव्हाण म्हणाले की, २८ जानेवारी रोजी झालेल्या या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, अपघाताला काही दिवस उलटूनही अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आणि संशय निर्माण झाला आहे. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदांमधून तसेच आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर मांडलेले मुद्दे पाहता हा अपघात केवळ तांत्रिक स्वरूपाचा नसून त्यामागे घातपाताची दाट शक्यता नाकारता येत नाही.

श्री. चव्हाण यांनी नमूद केले की, ऐनवेळी दादांचा दौरा बदलणे, विमानाची वेळ बदलणे तसेच पायलट बदलण्यात येणे, हे सर्व संशयास्पद आहे. तीन वेळा निलंबित करण्यात आलेल्या पायलटला व्हीव्हीआयपी उड्डाणाची जबाबदारी देण्यात येणे, रनवे २९ उपलब्ध असतानाही ‘टेबल टॉप’ असलेल्या रनवे ११ वर उतरण्याचा आग्रह धरणे, आवश्यकतेपेक्षा कमी दृश्यमानता असतानाही लँडिंगचा निर्णय घेणे, फ्लाइट रडारचा डेटा अचानक बंद होणे, तसेच अपघातापूर्वी मुख्य पायलटने पूर्ण मौन बाळगणे, या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या आहेत.

याशिवाय व्हीएसआर या विमान कंपनीच्या पायलट्सचा तब्बल ५० कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आलेला असणे, कंपनीच्या मागील अपघातांनंतरही ठोस कारवाई न होणे, तसेच अपघातानंतर फॉरेन्सिक तपास वेळेवर न होणे, या बाबी संशय अधिक गडद करणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता केवळ स्थानिक तपास यंत्रणांवर न राहता सीबीआयमार्फत उच्चस्तरीय व पारदर्शक चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी सांगितले की, अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे नेतृत्व होते. त्यांच्या निधनाबाबत राज्यातील जनतेच्या मनात शंका असतील तर त्या दूर करणे हे शासनाचे नैतिक कर्तव्य आहे. सत्य बाहेर येण्यासाठी निष्पक्ष आणि त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी होणे आवश्यक असून, सीबीआय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या तपासामुळेच जनतेचा विश्वास प्रस्थापित होऊ शकतो.

यावेळी तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, महिला तालुकाध्यक्ष उषाताई भामरे, शहराध्यक्ष भारत काटके, मनोज छोटू सोनवणे, चेतन वनीस, रत्नाकर सोनवणे, संजय पवार, विलास सोनवणे, पोपटराव सोनवणे, किरण सोनवणे, दिलीप सोनवणे, रोशन जाधव, गौरव सोनवणे, यश सोनवणे, मिलिंद शेवाळे, भाऊसाहेब चव्हाण, साहेबराव सोनवणे, यशवंत कात्रे, प्रज्वल भामरे, माधव सोनवणे, दादा सोनवणे, मयूर अहिरे, केदार सोनवणे, राजेंद्र सोनवणे व जनार्दन सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.