- मंत्रालयातील लाचप्रकरणी मांडली बाजू ; मुख्यमंत्र्यांना भेटून खुलासा करणार
नाशिक/नवी दिल्ली : एनजीएन न्यूज नेटवर्क
एसीबीने गुरुवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या क्लार्कला अटक केली. राजेंद्र ढेरंगे असे त्याचे नाव असून त्याने तक्रारदाराकडून 35 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकारामुळे चर्चेत आलेल्या अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज बाजू मांडली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करताना झिरवाळ यांनी त्याचा माझ्याशी थेट संबंध असल्याचे सिध्द झाल्यास आपण मंत्रीपदाचा राजीनामा देवू, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एसीबीने मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावर ढेरंगे याच्या लाचप्रकरणी मुसक्या आवळल्या. यासंदर्भात शुक्रवारी नवी दिल्ली येथे दौऱ्यावर आलेल्या झिरवाळ यांना प्रसारमाध्यमांनी विचारणा केली. संबंधिताने जे कृत्य केले, त्याला सरकार पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी. त्याची प्रत्यक्षाप्रत्यक्ष लिंक माझ्याशी जोडली गेली तर मी तत्काळ मंत्रिपदावरून पायउतार होईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुंबईत गेल्यानंतर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या प्रकरणाविषयी त्यांच्यासोबत चर्चा करेन, अशी माहितीही झिरवाळ यांनी दिली.
काय आहे प्रकरण ?
तक्रारदाराच्या औषधांच्या दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला होता. सदर निलंबन कारवाई रद्द करण्यासाठी राजेंद्र ढेरंगे या मंत्रालयातील क्लार्कने 50 हजार रुपये लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराकडून तक्रार प्राप्त होताच एसीबीने पडताळणीनंतर सापळा रचला, त्यात ढेरंगे रंगेहाथ पकडले गेले. त्यांचे कार्यालय आणि निवासस्थानी एसीबीकडून शोधाशोध करण्यात येऊन ढेरंगे यांच्यावर गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला.
——–
@ राजकीयदृष्ट्या मला कोणी टार्गेट करणार नाही. कारण माझा स्वभाव सगळ्यांना माहीत आहे. मी अशा प्रकारचे काहीही चुकीचे कधी केलेले नाही आणि यापुढेही कधी करणार नाही. तथापि, या प्रकरणाची नि:ष्पक्ष चौकशी करण्यात यावी. त्याची प्रत्यक्षाप्रत्यक्ष लिंक माझ्याशी जोडली गेली तर मी तत्काळ मंत्रिपदावरून पायउतार होईल.
- नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र राज्य
Comments are closed.