NGN News
Latest Marathi News

रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यास कटिबद्ध : नूतन महापौरांची ग्वाही

  • अडीच वर्षांत नाशिकला वेगळ्या उंचीवर नेणार; पदाची सूत्रे हाती घेताना व्यक्त केला संकल्प

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

शहराच्या विकासाला पूरक ठरणारे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासोबतच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कामांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल राहणार असल्याची माहिती महापौर हिमगौरी आहेर- आडके यांनी दिली.

शहराच्या सतराव्या महापौर म्हणून मंगळवारी सूत्रे हाती घेतल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आगामी आधीच वर्षांत नाशिकला लोकल ते ग्लोबल स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याचा माझा मानस आहे. सिंहस्थ कुंभमेळा तसेच शहर विकासाला सातत्यने प्राधान्य देताना नमामि गोदा, लॉजिस्टिक हब, तसेच आयटी हब यांचा सुयोग्य पाठपुरावा करण्यात येईल. कुंभमेळ्याच्या निमित्ताने केंद्र आणि राज्य शासनांकडून मोठा निधी येणार असून शहराचा चेहरामोहरा बदलेल, अशी विकासकामे प्रगती पथावर आहेत. रोड आणि एअर कनेक्टिविटी बलशाली होणार असल्याने धार्मिक आणि अध्यात्मिक नागरी म्हणून ओळख असलेले नाशिक औद्योगिक नगरी म्हणून वेगळ्या उंचीवर जाईल, असा विश्वासही नूतन महापौरांनी व्यक्त केला. नाशिकला सर्वार्थाने पोषक वातावरण आहे. इथे धार्मिक पर्यटन आणि वैद्यकीय पर्यटन मुबलक प्रमाणात विकसित करण्याकडे लक्ष दिले जाईल.

१०० दिवसांचा कृती आराखडा ..

गेल्या चार वर्षांत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवट अस्तित्वात होती. यामुळे अनेक विकासकामांना खिळ बसून शहरात ज्या गोष्टी होणे अपेक्षित होते, त्या पाठ्पुराव्याभावी झाल्या नाहीत. त्यासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात येईल. विविध सोयी-सुविधांच्या माध्यमातून नाशिककरांना अपेक्षित असलेल्या कामांची पूर्तता करून समृद्ध जीवन्शिलीची प्रचीती दिली जाईल. अनेक वर्षांपासून रखडलेल्या आयटी पार्क प्रकल्पाला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी माहितीही हिमगौरी आहेर- आडके यांनी दिली.

गैरसोय होतेय ही वस्तुस्थिती, पण …

नाशिक शहरात कुंभमेळा आणि तत्सम विकासकामे सुरु असल्याने रस्ते खड्डेमय आहेत तर अनेकदा नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर महापौर म्हणाल्या, ही वस्तुस्थिती असली तरी भविष्यातील विकासासाठी कामे करणे ही अपरिहार्यता आहे. नागरिकांनी सहनशील होवून प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. विशेषतः, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातून कोट्यावधी भाविक शहरात येणार असल्याने अपेक्षेनुरूप विकासकामे होणे आवश्यक आहे. सध्या गैरसोय होत असली तरी भविष्यात सुखकर रस्ते आणि तत्सम सुविधा नागरिकांना सुखावणाऱ्या असतील, असे मतही महापौरांनी व्यक्त केले.

Comments are closed.