- आनंदवली मनपा शाळेची ‘चंद्रभरारी’; शाळेसाठी अभिमानास्पद बाब
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील महापालिका शाळा क्रमांक 18 ,आनंदवली , शाळेतील विद्यार्थी व शिक्षक चंद्रावर पाठवली जाणार आहेत. ‘नासा’ या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या ‘आर्टेमिस-२’ मोहिमेत त्यांचा ऐतिहासिक सहभाग नोंदवला जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या नावांचे बोर्डिंग पास ‘नासा’कडून देण्यात आले आहे. हा क्षण शाळेसाठी अभिमानास्पद ठरत आहे. या मोहिमेत व्हर्चुअल गेस्ट म्हणून सहभागी होण्याबाबत नासाने आवाहन केले होते. या उपक्रमात नासाकडून केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून नाशिक मनपा आनंदवली शाळेने नोंदणी केली होती. यशस्वीरित्या विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर नासाकडून विद्यार्थी आणि शिक्षकांचे बोर्डिंग पास पाठवण्यात आले. त्यांना मोहिमेचे प्रक्षेपण ही व्हच्र्युअली पाहता येणार आहे. या विद्यार्थ्यांची नावे एका एसडी कार्ड मध्ये संग्रहित करून ओरियन यानाद्वारे चंद्राकडे पाठवली जाणार आहेत.
वैष्णवी दिवे, समृध्द सोनवणे, आरुष गायकवाड, सूरज सोमतकर यासह 35 विद्यार्थी व या विद्यार्थ्यांचे शिक्षक कुंदा बच्छाव यांच्यासह यावेळी शाळेचा ही बोर्डिंग पास विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आला.
या उपक्रमामागे शाळेतील उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव यांची कल्पकता आणि विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठीची धडपड दिसून येते. ” विद्यार्थ्यांना या बाल वयात अंतराळ मोहीम, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक , अंतराळवीर यांची माहिती व्हावी, त्यांच्या डोळ्यात स्वप्ने पेरली जावीत म्हणून आम्ही हा उपक्रम आयोजित केला होता ” असे बच्छाव म्हणाल्या, तर “आर्टेमिस मोहिमेची समग्र माहिती, अंतराळात गुरुत्वाकर्षण विरहित वातावरणात अंतराळवीर कसे राहतात, कसे खातात, झोपतात, हे सर्व विद्यार्थ्यांना माहित व्हावे म्हणून आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती दिल्याचे” मुख्याध्यापिका अनिता जाधव म्हणाल्या . आर्टमिस-२’ ही मोहीम एप्रिल २०२६ पूर्वी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होईल. अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे समारे ६ लाख ८५ हजार मैल प्रवास करून पॅसिफिक महासागरात परतणार आहेत. याची माहिती जगभरातील सर्वसामान्य जनतेला व्हावी साठी नासाने हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाबद्दल मनपा प्रशासनाधिकारी डॉ.मिता चौधरी , पालक, ग्रामस्थ सगळ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतक केले आहे.
—–
नासा ५४ वर्षांनी चंद्रावर पाठवणार अंतराळवीर
नासा ५४ वर्षांनंतर चंद्रावर अंतराळवीर पाठवणार आहे. आर्टेमिस-२ मोहिमेंतर्गत पुढील वर्षी रीड वैसमन, व्हिक्टर ग्लोवर , क्रिस्टिना कोख आणि जेरेमी हंनसन हे ४ अंतराळवीर १० दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परत येतील. ही मोहीम भविष्यात पुन्हा चंद्रावर उतरण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रणालींची तपासणी करण्याचे काम करेल. नासाने म्हटले आहे की, अर्टेमिस २ मानवाला चंद्रावर परत नेण्याच्या दिशेने एक महत्त्वाची मोहीम ठरेल.
Comments are closed.