* तंत्रज्ञानाने दिलेली संधी की निर्माण केलेली नवी आव्हाने ?
** एनजीएन न्यूज नेटवर्क
” घरातून शिक्षण ” ही कल्पना जर आपण काही वर्षांपूर्वी एखाद्याला सांगितली असती तर ती कदाचित अविश्वासनीय किंवा हास्यास्पद वाटली असती. पण ही अशक्य गोष्ट शक्य केली ती तंत्रज्ञानाने. तंत्रज्ञानात झालेल्या वेगवान बदलमुळे शिक्षण वर्गखोल्यांच्या चौकटीबाहेर पडले आणि अगदी सहज घराघरात डोकावले. बघता बघता ‘ऑनलाईन शिक्षण’ ही संकल्पना सर्वमान्य झाली. परंतु ह्यामुळे एक महत्वाचा प्रश्नदेखील उपस्थित होतो – ‘ ऑनलाईन शिक्षण ‘ : वरदान की समस्या?
ऑनलाईन शिक्षणाची जमेची बाजू म्हणजे शहर असो किंवा गाव, उत्कृष्ट शिक्षक व उत्तमोत्तम कोर्सेस आता इंटरनेट च्या माध्यमातून अगदी सहज उपलब्ध आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा सर्वात महत्वाचा फायदा कोणता असेल तर वेळेची बचत. कॉलेज, कोचिंग क्लास इत्यादीला जाण्यायेण्यासाठी लागणारा वेळ वाचतो. तोच वेळ विद्यार्थी इतर गोष्टीं साठी सत्कारणी लावू शकतो.शिवाय अजून एक जमेची बाजू म्हणजे ऑनलाईन lectures रेकॉर्डेड असतात. न समजलेला भाग पुन्हा पाहण्याची सुविधा ह्यांत उपलब्ध असते. शिवाय, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे डिजिटल कौशल्ये आत्मसात होतात, जी मुलांना पुढील करिअर च्या दृष्टीने देखील उपयुक्त ठरू शकतात.
मात्र जसे नाण्याला दोन बाजू असतात, हेदेखील अगदी तसेच आहे. जमेच्या बाजू आहेत, तशाच काही अडचणी देखील आहेत. ऑनलाईन शिक्षणातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे एकाग्रतेचा अभाव. ऑनलाईन अभ्यास करत असताना social media, गेम्स किंवा इतर अँप्स मुळे मुलांचे लक्ष विचलित होणे अगदी सहज शक्य आहे. मी स्वतः एक शिक्षिका असल्यामुळे covid दरम्यान काही काळ ऑनलाईन अध्यापन केलंय. त्याकाळात मला जाणवलेली एक मोठी समस्या म्हणजे अशा शिक्षणातून विद्यार्थी व शिक्षक ह्यांच्यात प्रत्यक्ष संवाद शक्य नसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजला की नाही हे शिक्षकांना लक्षात येणे खूप कठीण होते. शिवाय, वर्गात एक प्रकारे तयार होणारे शिक्षणाचे वातावरण, मित्र – मैत्रिणींसोबत अभ्यासावर चर्चा आणि स्पर्धा यामुळे जी शिकण्याची प्रेरणा मिळते ती ऑनलाईन माध्यम कधीच देऊ शकत नाही. आणि, दीर्घकाळ स्क्रीनसमोर असल्याने डोळयांवर परिणाम होतो तो वेगळाच. आणि सर्वात महत्वाची उणीव म्हणजे शिस्त. ज्या सातत्याने लक्षपूर्वक वर्गात अभ्यास केला जातो ती शिस्त ऑनलाईन अभ्यासात अपेक्षित असणे जरा कठीणच, नाही का?
मग सरतेशेवटी निष्कर्ष काय? तर ऑनलाईन शिक्षण वरदान की समस्या हे ठामपणे सांगता यायचे नाही. ते फक्त तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेले एक प्रभावी साधन आहे. शिक्षणाचे माध्यम बदलले तरी शिकण्याची जिद्द, सातत्य आणि स्वयंशासन ही मूल्ये जर विद्यार्थ्यांमध्ये असली, तर ऑनलाईन शिक्षण हे नक्कीच वरदान ठरू शकते. परंतू ह्या सगळ्या मूल्यांचा अभाव असेल तर हेच माध्यम एक समस्या निर्माण करेल. शेवटी वापर कसा यावर परिणाम अवलंबून. इतकंच म्हणेन की तंत्रज्ञान हे सहाय्यक आहे, पर्याय नाही हे लक्षात घेणं नक्कीच गरजेचं.
( लेखिका शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आहेत )
Comments are closed.