NGN News
Latest Marathi News

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असो. उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी डॉ. हर्षल संचेती

  • आयुर्वेद, योग व निसर्गोपचार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

येथील आयुर्वेद व निसर्गोपचार क्षेत्रातील प्रख्यात चिकित्सक, रेकी प्रशिक्षक व लाइफ मॅनेजमेंट कोच डॉ. हर्षल अजितकुमार संचेती यांची आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख या महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने आयुर्वेद, योग व निसर्गोपचार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर येथे १ फेब्रुवारी रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडले. या अधिवेशनास राज्यातील आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, नॅचरोपॅथी, युनानी व ॲक्युपंक्चर क्षेत्रातील अनेक नामवंत चिकित्सक उपस्थित होते. अधिवेशनात आयुष चिकित्सेच्या प्रसार-प्रचार व संघटन विकासावर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

डॉ. हर्षल संचेती गेली १७ वर्षे अल्टरनेटिव्ह मेडिसिन, आयुर्वेद, निसर्गोपचार, न्यूट्रास्युटिकल्स, लाइफ कोचिंग व रेकी प्रशिक्षणाच्या माध्यमातून रुग्णसेवा करत आहेत. त्यांचे संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. प्रेरक वक्ते व मानसशास्त्र अभ्यासक म्हणून ते अनेक कॉर्पोरेट कंपन्यांना कर्मचारी सक्षमीकरण, वर्क-लाईफ बॅलन्स व व्यवसाय वृद्धीबाबत मार्गदर्शन करतात.

सामाजिक, धार्मिक कार्य तसेच गोसेवेतही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. प्रभू परिवार ही त्यांची संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. यापूर्वीही त्यांच्या कार्याचा विविध सामाजिक संस्थांकडून गौरव करण्यात आला आहे. या कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. नितीनराजे पाटील, चेअरमन डॉ. सतीश कराळे, अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, डॉ. अभिजित कवठकर, डॉ. संतोष वैद्य यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या निवडीबद्दल डॉ. हर्षल अजितकुमार संचेती यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Comments are closed.