NGN News
Latest Marathi News

अजित पवार यांच्या निधनाने लोकनेता हरपला; सर्वपक्षीयांची भावना

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

स्व.अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र एका लोकनेत्याला कायमचे मुकले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यात कुठलीही तडजोड त्यांनी केली नाही. यापुढील काळातही आपण सर्व त्यांनीच दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करू अशा शब्दात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना आज सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व नाशिककरांच्या वतीने नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात आयोजित शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार पंकज भुजबळ, आमदार सरोज आहिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार दिपिका चव्हाण, बाळासाहेब सानप, जयवंतराव जाधव, शिवराम झोले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सुनील केदार, सुधाकर बडगुजर, शाहू खैरे, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रेरणा बलकवडे, निवृत्ती अरिंगळे, आकाश छाजेड, सीमंतिनी कोकाटे, दत्ता गायकवाड, सुदाम कोंबडे, बाळासाहेब पिंगळे, बाळासाहेब कर्डक, अजय बोरस्ते, गोरख बोडके, अर्जुन टिळे, नानासाहेब महाले, करण गायकर, सुदाम कोंबडे, सुरेश अण्णा पाटील, ॲड. भगीरथ शिंदे,चेतन गांगुर्डे, प्रवीण तिदमे, योगिता आहेर, अजिंक्य वाघ, आनंद सोनवणे, प्रवीण जाधव, विठ्ठल उगले  कविता कर्डक, सचिन पिंगळे, अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, प्रशासनाच्या वतीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आदिवासी आयुक्त लीना बनसोड, मनपा आयुक्त मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी ओंकार पवार यांच्यासह अधिकारी, विविध पक्षांचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते व नाशिककर बहुसंख्येने उपस्थित होते. 

मंत्री छगन भुजबळ म्हणाले , स्व.अजितदादा हे आपल्याला सोडून गेले. यावर अद्यापही आपला विश्वास बसत नाही. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा धक्का आहे. लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेल्या अजित दादांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपली वाटचाल केली. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करत असताना त्यांनी कुठेही तडजोड केली नाही. नाशिककरांवर त्यांचे विशेष प्रेम होते नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी आपलं महत्त्वाचं योगदान दिलं. 

मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, स्व.अजितदादा यांच्या निधनामुळे आपण कुटुंबप्रमुखाला मुकलो आहोत. कधीही वेळ वाया न घालवता कामाला प्राधान्य त्यांनी दिले. प्रत्येकाची कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी काळजी घेतली. त्यांच्या निधनाने आपण सर्व पोरके झाले आहोत अशा शुभ भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी ॲड.माणिकराव कोकाटे म्हणाले की, स्व.अजितदादा पवार यांच्या निधनावर अद्यापही विश्वास बसत नाही. प्रत्येक घराघरात, नेत्याना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हा धक्का आहे.  सातत्याने काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख राहिली. त्यांच्या निधनाने एका लोकनेतेला आपण मुकलो आहोत. राज्यातील गोरगरीब जनतेचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. यापुढील काळात स्व. अजितदादा पवार यांचे विचार पुढे नेण्यासाठी काम करू अशा शोक भावना त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी आमदार दिलीप बनकर म्हणाले की, स्व.अजित दादा पवार यांच्याकडे कोणीही विकासाचे काम घेऊन गेले की तो कधीही रिकाम्या हाती परत आला नाही. फुले शाहू आंबेडकरांचे पुरोगामी विचार त्यांनी राज्यात रुजविण्याचा प्रयत्न केला अशा शोक भावना त्यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी उपस्थित विविध पक्षातील नेते पदाधिकारी प्रशासनातील अधिकारी यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. तसेच यावेळी अस्थिकलशास पुष्प अर्पण करत सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Comments are closed.