NGN News
Latest Marathi News

सरपंच मांदियाळीने कृषी महोत्सवाची सांगता; 13 जोडप्यांची जुळली रेशीमगाठ

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने 23 जानेवारी पासून नाशिकमध्ये युथ फेस्टिवल मैदानात सुरु असलेल्या भव्य जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप आज सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांच्या मंदियाळीने झाला. पाच दिवसीय या सोहळ्यात प्राचीन ते आधुनिक शेती, विषमुक्त शेतीचा जागर झालाच पण 13 जोडप्यांची रेशीमगाठ जुळली, 110 जणांना नोकरी मिळाली तर 5000 महिलांनी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेतले. एकूण चार लाख महिला, पुरुषांनी पाच दिवसात भेट दिल्याने हा महोत्सव अत्यंत यशस्वी झाल्याची भावना समारोप प्रसंगी गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांनी बोलून दाखवली.

प्रजासत्ताक दिनी कृषी महोत्सवातील मुख्य मंडपाला लग्न घराचे स्वरूप प्राप्त झाले होते. दिनांक 23 ते 26 या कालावधीत रोज विधवा, विधुर, घटस्फोटीत, दिव्यांग, आत्महत्याग्रस्त, अतिवृष्टी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मुलं, मुली, सर्व धर्मीय विवाह इच्छुक यांचेसाठी नावनोंदणी आणि परिचय तसेच योग्य स्थळ सुचविण्याचे काम अनुभवी सेवेकरी एका दालनात दिवसभर करीत होते. समाधानाची आणि आनंदाची बाब अशी की या चार दिवसात 13 जोडप्यांचे विवाह निश्चित झाले आणि मुख्य मंडपात सामुदायिक सोहळ्यात या सर्वांचे विवाह संपन्न झाले.

वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती

या वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे, राज्याचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील, कुंभ मेळा मंत्री ना गिरीश महाजन, आबासाहेब मोरे, चंद्रकांत दादा व नितीन भाऊ मोरे, माजी आमदार बाळासाहेब सानप,अपूर्व हिरे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव,नगरसेवक सागर लामखडे, रिद्धेश निमसे,राहुल दिवे, ज्योती जोंधळे, आशा तडवी, पुजा नवले, प्रवीण नवले, भा ज प महिला आघाडीच्या सोनालीराजे पवार, लक्ष्मण सावजी, डॉ प्रदीप पवार व हजारो वऱ्हाडी उपस्थित होते. मंगळाष्टकांच्या जयघोशात सर्वांनी या वधू वरांना शुभाशीर्वाद दिले.

ना गिरीश महाजन व ना विखे पाटील यांनी गुरुमाऊली यांच्या शेतकरी हिताच्या आणि समाजपयोगी कार्याचे तोंडभरून कौतुक केले. ना राधाकृष्ण विखे पाटील उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले या प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञान तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त नव्या संकल्पनांची सविस्तर माहिती घेण्याची संधी मिळाली. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमता वाढीसाठी आणि शेती अधिक शाश्वत करण्यासाठी असे उपक्रम निश्चितच मार्गदर्शक ठरत असल्याचे यावेळी जाणवले.

यावर्षी या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असलेल्या आदरणीय गुरूमाऊली यांच्या सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नववधू-वरांना मनःपूर्वक शुभेच्छा देतांना खूप आनंद होत आहे. खर्चिक विवाह पद्धतीला पर्याय ठरणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून, गावोगावी अशा सामुदायिक विवाह चळवळीला पुढे नेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.

यासोबतच राज्यात सेंद्रिय शेतीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी महायुती सरकार ठोस पावले उचलत असून दुष्काळमुक्त महाराष्ट्र व विषमुक्त शेती घडवण्याचा संकल्प शासनाचा आहे. शेती, समाज आणि पर्यावरण यांचा समतोल साधणाऱ्या अशा उपक्रमांमधून राज्याच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच बळ मिळेल, असा विश्वास यावेळी ना विखे पाटील आणि ना गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. पूर्वी विवाह घरातील थोरामोठ्यांच्या सल्ला व मार्गदर्शनाखाली व्हायची म्हणून ती टीकायची, आज याबाबत खूपच बदल घडून आले आहेत हे सांगताना माझा विवाह घरातील मोठया माणसांनीच ठरवला व त्यावेळी असेच विवाह व्हायचे असा दाखलाच ना महाजन यांनी दिला.

आजच्या पर्यावरण चर्चासत्रात डॉ अजित गोखले तर सायबर सुरक्षा चर्चेत डॉ ओंकार गंधे यांनी तर सरपंच मंदियाळीत गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे,खासदार भास्करराव भगरे,आबासाहेब मोरे, आमदार सीमा हिरे, मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे, महाऊर्जा महाव्यवस्थापक अनंत अग्निहोत्री, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव नितीन कावेडे यांनी मार्गदर्शन केले.
चंद्रकांतदादा मोरे यांनी आभार प्रदर्शन केले.

Comments are closed.