आंतरराष्ट्रीय ‘ग्लोबल व्हिलेज इंडस्ट्रियल कॉन्फरन्स’मध्ये सहभाग
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गुंतवणूक धोरणाचा लाभ घेत उद्योगांनी महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉरमध्ये, विशेषतः नाशिक–धुळे व अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर या विभागांत आपले उद्योग सुरू करावेत, असे आवाहन संरक्षण नवोन्मेष केंद्राचे संचालक प्रदीप पेशकर यांनी केले.
ते दक्षिण गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने सुरत येथे आयोजित आंतरराष्ट्रीय ‘ग्लोबल व्हिलेज इंडस्ट्रियल कॉन्फरन्स’मध्ये बोलत होते. या परिषदेला जपान, कॅनडा, झिंबाब्वे, लिथुआनिया, बोत्सवाना, सायप्रस, मॉरिशस, घाना आदी १४ देशांतील मंत्री, व्यावसायिक दूतावासांचे प्रतिनिधी व राजदूत उपस्थित होते. परिषदेत औद्योगिक प्रदर्शन, विविध विषयांवरील परिसंवाद तसेच उत्पादन प्रकल्पांना भेटी असा भरगच्च कार्यक्रम होता. गुजरातमधील नामांकित उद्योजकांशी व्यापार व उद्योग विस्ताराच्या संधी शोधण्यासाठी विविध देशांतील प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते.
या वेळी पेशकर यांनी महाराष्ट्राचे गुंतवणूक धोरण तसेच राज्यातील संरक्षण कॉरिडॉरची सविस्तर माहिती देत उद्योजकांना महाराष्ट्रात उद्योग स्थापन करण्याचे आवाहन केले. वैयक्तिक भेटी दरम्यान अनेक उद्योजकांनी संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाचा लाभ कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन मागितले. या दौऱ्यादरम्यान पेशकर यांनी सूरत डायमंड बोर्स (SDB) येथील प्रमुख हिरा उत्पादन प्रकल्पांसह वस्त्रोद्योग व सौर पॅनेल निर्मिती प्रकल्पांनाही भेटी दिल्या.
या उपक्रमाची माहिती त्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी प्रयत्नांचे कौतुक करत राज्य शासनाकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. नाशिकमधील उद्योजक रोहन कुलकर्णी व अरिंजय नाईक यांनीही या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
Comments are closed.