- विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणाने रंगत; उपस्थितांची दाद
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
रंगीबेरंगी पेहरावातील विद्यार्थ्यांचे चमू.. देशभक्तीपर गीतांवरील नृत्ये.. बालमित्रांचा सर्जनशील सांगीतिक साज.. प्रत्येक गीतानंतर उपस्थितांनी दिलेली भरभरून दाद.. अशा प्रसन्न वातावरणात सुवर्णमहोत्सवी वर्षाची वाटचाल करणाऱ्या सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर येथे प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला.
भारतीय संस्कृतीचा अनोखा मिलाफ साधणाऱ्या या सोहळ्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध देशपक्तीपर गीतांचे नृत्यासह सादरीकरण केले. सुमारे दोन तास सुरु असलेली ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. उपस्थित अतिथींसह पालकांनी बालमित्रांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. तत्पूर्वी, मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. प्रतिभा पगार, डॉ. अतुल सोनवणे, चेतन जोशी डॉ. कृपाली मांजरेकर, डॉ. प्रणाली देशपांडे, ज्येष्ठ संपादक मिलिंद सजगुरे, प्रशांत सावंत, शितल पाटील, अपर्णा घाटे, पास्टर दीपक शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवर अतिथींच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभू येशूच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर पवित्र ग्रंथ बायबल मधील वचनांचे पठण झाले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनींनी सुंदर प्रार्थना गीते सादर केली. विद्यार्थ्यांनी मनात देशप्रेम जागृत ठेवावे,असा संदेश मान्यवरांनी आपल्या भाषणात दिला. या कार्यक्रमाला संस्थापक डॉ. ऑगस्टिन पिंटो, संस्थापिका डॉक्टर ग्रेस पिंटो यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे, शितल चिंचोलीकर यांनी प्रयत्न केले.
संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष
आधुनिक युगाचे सांदीपनी म्हणून ज्यांना ओळखले जाते ते आमच्या शाळेचे संस्थापक डॉक्टर अगस्टीन पिंटो यांनी दोन जून 1976 रोजी मालाड मुंबई येथे पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या या कार्याला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. या गोष्टीचे औचित्य साधून हे वर्ष संस्था सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करणार आहे. त्या अनुषंगाने वर्षभर विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Comments are closed.