NGN News
Latest Marathi News

श्री सप्तश्रृंग देवी ट्रस्ट व्यवस्थापन विरोधातील उपोषण मागे; व्यवस्थापक निलंबित

** राज रघुवीर जोशी

सप्तशृंगगड | एनजीएन न्यूज नेटवर्क

आई सप्तशृंगीच्या पवित्र गडावर अखेर अन्यायाविरोधातील जनआक्रोशाचा उद्रेक झाला! श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टमधील कथित मनमानी, आर्थिक गैरव्यवहार, कर्मचाऱ्यांचे शोषण, महिलांवरील गंभीर आरोप आणि दडपशाही कारभाराविरोधात सुरू असलेले पाच दिवसांचे आमरण उपोषण अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचले.

ग्रामस्थ, कर्मचारी आणि महिलांचा संताप शिगेला पोहोचताच ट्रस्ट विश्वस्त मंडळाला झुकावे लागले. उपोषणकर्ते छगन जाधव व बेबीबाई जाधव यांच्या १ ते १६ मागण्यांवर विश्वस्त मंडळाने लेखी आश्वासन देत मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांना तात्काळ निलंबित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतरच उपोषण मागे घेण्यात आले.

कर्मचाऱ्यांचा आक्रोश – वर्षानुवर्षे कायम नोकरी नाही!

३ ते ५ वर्षांपासून सेवा देणाऱ्या हंगामी, रोजंदारी तथा मानधनी कर्मचाऱ्यांना अद्याप कायम न करणे, विम्याच्या नावाखाली पगारातून कपात करून लाभ न मिळणे, या साऱ्या गंभीर बाबी चर्चेत आल्या.

लाडू विभागातील श्रमशोषण उघड

लाडू विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार जाणीवपूर्वक अडवून ठेवण्यात आल्याचे मान्य करत थकीत पगार अदा करण्यात आले. पगारातून सुरक्षा म्हणून कपात केलेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर परत करण्यात आली.

‘आठ ते दहा दिवसांत अहवाल’ – विश्वस्तांचे आश्वासन

विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले की,

१. व्यवस्थापक निलंबनात राहतील

२. त्रिसदस्यीय समितीत उपोषणकर्त्यांच्या सूचनेनुसार दोन सदस्य असतील

३. चौकशी ८ ते १० दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर केला जाईल

न्याय न मिळाल्यास आझाद मैदान!’

उपोषण मागे घेत असतानाही छगन जाधव यांनी ठणकावून सांगितले,

“चौकशी पारदर्शक नसेल, दोषींवर कारवाई झाली नाही, तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू. गरज पडली तर आझाद मैदान गाजवू!”

सामन्याचा सवाल –

आईच्या गडावर न्याय कधी नांदणार?  व्यवस्थापक निलंबित झाले, चौकशी समिती नेमली गेली…

पण प्रश्न कायम आहे –

श्रद्धेच्या नावाखाली झालेल्या कथित गैरव्यवहारांना खरंच पायबंद बसेल का?

की चौकशीचा बुडबुडा फुटून सगळं ‘मॅनेज’ केलं जाईल?

आई सप्तशृंगीच्या दरबारात आता एकच मागणी आहे –

दोषींना शिक्षा आणि व्यवस्थेत पारदर्शकता!

“व्यवस्थापकाच्या मनमानी कारभाराविरोधात पाच दिवस उपोषण सुरू होते. ग्रामस्थ, कर्मचारी व भाविक सर्वच त्रस्त होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन व्यवस्थापकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

चौकशी १० ते १५ दिवसांत पूर्ण होईल, अहवालानंतर साधारण महिन्याभरात अंतिम निर्णय घेण्यात येईल.”

भूषणराज शशिकुमार विश्वस्त श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट

“छगन जाधव व बेबीबाई जाधव यांचे पाच दिवसांचे उपोषण आज सर्व विश्वस्त, जयश्री पवार, पोलीस अधिकारी, ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चेनंतर मागे घेण्यात आले. काल झालेल्या विश्वस्त बैठकीत नियमांत बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

उर्वरित आरोप व तक्रारींसाठी समितीमार्फत सखोल चौकशी होईल. चौकशीचा अहवाल शक्य तितक्या कमीत कमी कालावधीत, जास्तीत जास्त ३० दिवसांत सादर करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

ॲड. ललित निकम विश्वस्त श्री सप्तशृंग निवासीनी देवी ट्रस्ट

———–

“छगन जाधव व बेबीबाई जाधव यांच्या १ ते १६ मागण्यांवर सखोल चौकशीचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यवस्थापकांना निलंबित करण्यात आले आहे. ८ ते १० दिवसांत अहवाल सादर केला जाईल.

प्रोबेशनवरील कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय, लाडू विभागातील थकीत पगार अदा, तसेच महिलांवरील गंभीर आरोपांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. या निर्णयांमुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे.”

मनज्योत पाटील विश्वस्त श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट 

“आम्ही गेल्या पाच दिवसांपासून सर्व कर्मचाऱ्यांसह अमरण उपोषणाला बसलो होतो. आज विश्वस्त समिती येथे आली आणि आमच्या मागण्यांवर ८ ते १० दिवसांत पूर्ततेचे लेखी आश्वासन दिले. काही मुद्द्यांसाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली असून, ती पारदर्शक व्हावी म्हणून माझ्या सूचनेनुसार सदस्य असतील.

ज्या मागण्या चौकशीशिवाय पूर्ण होऊ शकतात, त्या तात्काळ पूर्ण होतील. मात्र ठरलेल्या वेळेत न्याय न मिळाल्यास, मी पुन्हा रस्त्यावर उतरेन आणि गरज पडल्यास आझाद मैदानापर्यंत लढा नेईन.”

उपोषणकर्ते श्री छगन जाधव व बेबीबाई जाधव

“सप्तशृंगगड येथे व्यवस्थापकाच्या मनमानी कारभाराविरोधात बेबीबाई व छगन जाधव यांचे पाच दिवस उपोषण सुरू होते. दानातील चांदीतील कथित गैरव्यवहार, कर्मचाऱ्यांना कायम न करणे, विमा कपात व दयनीय निवासव्यवस्था हे गंभीर मुद्दे होते.

या मागण्यांवर विश्वस्त मंडळाने चर्चा करून अनेक मागण्या मान्य केल्या असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत व्यवस्थापक निलंबित करण्यात आला आहे. स्वतंत्र समितीमार्फत पारदर्शक चौकशी होणार असून, ८ ते १० दिवसांत अहवाल अपेक्षित आहे. लेखी आश्वासनामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे.”

जयश्री पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष

—-

स्थानिकांना प्राधान्य देत हंगामी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे 

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट मध्ये अनेक कर्मचारी हे ३०० ते ३५० रुपये रोज असून सदरच्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत व ५०० ते ७०० रुपया रोज करून कायमसेवेतील सर्व सेवा सुविधा लागू कराव्या.

राजेश गवळी, सप्तशृंग गड ग्रामपंचायत सदस्य

Comments are closed.