- ५१ टक्के रहिवाशांची संमती असल्यास पुनर्विकास शक्य; नवीन बांधकाम नियमावली लवकरच
- क्रेडाईची पुनर्विकास परिषद उत्साहात
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सध्या नाशिकमधील सुमारे ८००० हून अधिक इमारती ३० वर्षाहून अधिक जुन्या आणि धोकादायक असून या इमारतींचा पुनर्विकास करण्याची आवश्यकता आहे. नाशिकमध्ये इमारती पुनर्विकास करण्यासाठी बँक गॅरंटी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट ची आवश्यकता नाही. तसेच ५१ टक्के रहिवाशांची संमती असल्यास पुनर्विकास शक्य असून पुनर्विकास प्रक्रियेसाठी पुणे आणि ठाणे च्या धर्तीवर लवकरच नियमावली येण्याची शक्यता असून या मुळे पुनर्विकास सुलभ होणार असल्याचे मत पुनर्विकास क्षेत्रात काम करणाऱ्या विविध तज्ञांनी व्यक्त केले. पुनर्विकास प्रक्रिया ,कर प्रणाली आणि कायद्यामध्ये निरंतर बदल झाले असून या मुळे जुन्या इमारतींचा पुनर्विकास करणे शक्य होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे नाशिकमध्ये इमारत पुनर्विकास प्रक्रियेतील कायदेशीर नियम, शासकीय परवानग्या, आर्थिक बाबी व जबाबदाऱ्या याबाबत पुरेशी माहिती मिळावी यासाठी पुनर्विकास परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत तज्ञांनी मार्गदर्शन केले. नियोजन व विविध परवानग्या या विषयावर आर्की.राजेश चौधरी, कर आणि जीएसटी या विषयावर सीए संकेत शहा ,कायदेशीर तरतुदी या विषयावर महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड.डॉ.सुधाकर आव्हाड यांनी मार्गदर्शन केले. परिषदेचे उद्घाटन राज्याचे जल व्यवस्थापन आणि कुंभ मेळा मंत्री गिरीश महाजन,यांनी ऑनलाईन पद्धतीने केले.
यावेळी मंचावर निलेश बोरा, गणेश गीते, को ऑपरेटिव्ह सोसायटी चे उप निबंधक संदीप जाधव, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, मानद सचिव तुषार संकलेचा, परिषदेचे संयोजक व क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष उदय घुगे, माजी अध्यक्ष कृणाल पाटील आणि कृष्णा डेव्हेलपरचे अभिजीत पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात बोलताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले, क्रेडाईतर्फे नेहमीच शहर आणि ग्राहक केंद्रबिंदू ठेऊन कार्य केले आहे. नाशिक ब्रॅण्डिंग आणि स्किलिंग या सोबतच इमारती पुनर्विकास साठी उचललेले ही पाऊल शहर विकासात मोलाचा टप्पा ठरेल असेही त्यांनी नमूद केले. उदय घुगे म्हणाले, विकासक आणि सोसायटी मधील रहिवासी यांना नियमाची माहिती होऊन सुसंवाद प्रस्तावित होऊन पुनर्विकासाचा मार्ग मोकळा व्हावा हा या परिषदेचा हेतू आहे. परिषदेनंतर क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे हेल्प डेस्क सुरू करण्यात येणार असल्याची देखील त्यानीं माहिती दिली.
क्रेडाई नाशिक मेट्रो चे माजी अध्यक्ष सुरेश पाटील ,अनंत राजेगावकर, विजय संकलेचा ,सुनील कोतवाल ,उमेश वानखेडे, अनिल आहेर, मनोज खिवंसरा, अंजन भालोदिया, श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड, ऋषिकेश कोते, हंसराज देशमुख, समिती सदस्य सुशील बागड, कृष्णा कपिले, अभिषेक बिरारी आदि उपस्थित होते.
कोण काय म्हणाले ?
नाशिक स्वच्छ ,सुंदर आणि सुरक्षित करणे हे ध्येय असून यामध्ये जुन्या इमारतीं चा पुनर्विकास हा एक महत्वाचा भाग आहे. या प्रक्रियेत समन्वय ,पारदर्शकता आणि नैतिकता आवश्यक असून या प्रक्रियेत असलेल्या अडी अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढू.
- गिरीश महाजन, जलसंधारण तथा कुंभ मंत्री, महाराष्ट्र
नाशिकचे सर्व लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासन एकत्रित येऊन आगामी दोन वर्षात नाशिकचा कायापालट करणार असून शहराला नवीन स्काय लाईन तसेच जुन्या इमारतींमधील रहिवाशांना नव्या लाईफस्टाईल ची अनुभूती देण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित इमारत पुनर्विकास परिषद ही या विकास प्रक्रियेतील मोलाचा टप्पा ठरणार आहे.
- आ. सीमा हिरे
क्रेडाईचा हा उपक्रम स्तुत्य असून यामुळे अनेक रहिवाशांचे आधुनिक घराचे स्वप्न पूर्ण होईल. यासंदर्भात राज्य सरकारकडून आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्यास आम्ही कटिबद्ध राहू.
- अजय बोरस्ते, उपनेते, शिवसेना
Comments are closed.