NGN News
Latest Marathi News

मालेगावजवळ खासगी ट्रॅव्हल्स-पिकअप धडकले; चौघांचा मृत्यू

  • पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात; २० जण जखमी

मालेगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

मालेगाव–मनमाड महामार्गावर सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. दुर्घटनेत 20 पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सदर अपघात मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे गावाजवळ पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुण्याहून मालेगावच्या दिशेने येणारी एक खासगी ट्रॅव्हल्स आणि समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, पिकअप वाहन थेट ट्रॅव्हल्समध्ये घुसले आणि बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय ट्रॅव्हल्समधील 20 हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य राबवण्यात आले. जखमींना मालेगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे मालेगाव–मनमाड मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. 

Comments are closed.