NGN News
Latest Marathi News

कृषीतज्ज्ञ सुभाष शर्मा यांना गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

  • रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची घोषणा
  • गोदा जन्मोत्सवानिमित्त आयोजित समरसता महोत्सवात होणार सन्मान

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, नासिक यांच्या वतीने गोदा जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रजीवन सन्मान व आध्यात्मिक समरसता महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कृषी तज्ज्ञ पद्मश्री सुभाष शर्मा यांना गोदा राष्ट्रजीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक कार्य व पर्यटन मंत्री श्रीमान गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सदर सोहळ्याला राष्ट्र सेविका समितीच्या संचालिका शांताकुमारी, राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष विजया रहाटकर, इस्कॉनचे मार्गदर्शक गौरांग प्रभुजी या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी विशेष आकर्षण म्हणून ११११ महिलांची भव्य गोदा महाआरती आयोजित करण्यात येत आहे. या महाआरतीत परिचारिका, डॉक्टर, वैद्य, अभियंता, पोलीस खात्यातील महिला, महिला वकील, कामगार वर्गातील महिला वनवासी क्षेत्रातील युवती यांच्यासह समाजाच्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान मातृशक्तीचा तसेच विविध जाती, संस्था, संघटना व सामाजिक घटकांतील महिलांचा सहभाग असणार असून, समरसतेचे जिवंत चित्र या माध्यमातून समाजासमोर उभे राहणार आहे.

पत्रकार परिषदेला समिती अध्यक्ष जयंत गायधनी , उपाध्यक्ष भक्तीचरण दास महाराज, नरसिंहकृपा प्रभु, सचिव मुकुंद खोचे, धनंजय बेळे, शैलेश देवी, चिराग पाटील, दीपक भगत, डॉ.अंजली वेखंडे, आशिमा केला, शिवाजी बोंदारडे, वैभव क्षेमकल्याणी, नरेंद्र कुलकर्णी, कल्पेश लोया, आशुतोष केला, विनीत पिंगळे, चैतन्य गायधनी, अक्षय शेरताटे, राजेंद्र फड आदि उपस्थित होते.

Comments are closed.