- विनायक पांडे, यतीन वाघ, नितीन भोसले, दिनकर पाटील, शाहू खैरे यांच्या हाती कमळ
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
शिवसेना ( उबाठा ) च्या दोन माजी महापौरांसह एक माजी आमदार, मनसे सरचिटणीस तसेच कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाने गुरुवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतले. राज्यात दोन्ही ठाकरे बंधूनी एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर चोवीस तासांतच नाशकात भाजपने शिवसेना ( उबाठा ) ला सुरुंग लावण्याची खेळल्याचे बोलले जात आहे. तथापि, या पक्षप्रवेशाला भाजपच्या आमदार तथा महापालिका निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध दर्शवल्याने भाजपमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. आ. फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवत अनुपस्थित राहणे पसंत केले.
नाशिक महानगरपालिका निवडणुक पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवसेना ( उबाठा ) चे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ, माजी आमदार नितीन भोसले, मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे मंत्री गिरीश महाजन आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. हे सर्व जण महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र, पक्षाच्या निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी सदर पक्षप्रवेशाला जाहीर विरोध दर्शवला. समाज माध्यमावर पोस्ट टाकत त्यांनी खदखद व्यक्त केली आहे.
काय म्हणाल्या आ. फरांदे ?
प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही. ज्यांनी आजपर्यंत हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेतली अशा लोकांना ‘रेड कार्पेट’ पक्ष देत असेल तर आम्ही निष्ठावंत म्हणून काम करत आहोत, आमच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असा आमचा विश्वास आहे.
प्रवेश झाला म्हणजे तिकिट मिळेलच असे नाही : महाजन
आ. देवयानी फरांदे यांचा पांडे, वाघ , खैरे यांच्यासह इतरही पक्षप्रवेशाला विरोध होता. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मंत्री गिरीश महाजन म्हणाले, त्यांचा विरोध लवकरच मावळेल तसेच, पक्षात प्रवेश घेतला म्हणजे तिकिट मिळेलच असं नाही, भाजपात आज सात-आठ जण प्रवेश करत आहेत. मात्र, या सगळ्यांनाच तिकिट मिळेल असे नाही, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. तर, गेली अनेक वर्षं कार्यकर्ते पक्षात काम करतात, त्यामुळे विरोध होणं, थोड्या बहुत प्रमाणात नाराजी असणे साहजिक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘वसंतस्मृती’ ला पोलीस छावणीचे स्वरूप..
विरोधी पक्षांतील दिग्गज गुरुवारी दुपारी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याची वार्ता पसरल्यापासूनच निष्ठावंत संतप्त झाले. त्यातच आ. फरांदे यांची समाजमाध्यमांवरील पोस्ट निष्ठावांताना बळ देणारी ठरली. भाजपच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात करण्यात आली होती. यावेळी निष्ठावंत आणि नवगत यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होवून घोषणाबाजी करण्यात आली. मंत्री गिरीश महाजन यांचे आगमन झाले तेव्हा त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी कशीबशी वाट काढत व्यासपीठ गाठले.
Comments are closed.