NGN News
Latest Marathi News

संगमनेरात थोरात-तांबे ‘रिटर्न्स’; मैथिली तांबे रेकोर्डब्रेक मतांनी विजयी

  • विधानसभेचा वचपा; आ. खताळ यांना धोबीपछाड; सेवा समितीचा नगराध्यक्षपदासह २७ जागांवर विजय

** गौतम गायकवाड

|संगमनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क

संगमनेर नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत सेवा समिती ने विजय संपादन करून पालिकेवर निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांनी तब्बल १६ हजार ४०८ मतांनी विक्रमी विजय मिळवला. त्यांना २८ हजार ३९७ मते मिळाली. विरोधी महायुतीच्या उमेदवार आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा संदीप खताळ (११ हजार ९८९) यांचा पराभव झाला. उर्वरित ३० सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत सेवा समितीचे २७ सदस्य निवडून आले, दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले.

विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या सत्तांतरानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अमोल खताळ यांच्या राजकीय अस्तित्वाची ही निवडणूक मानली जात होती. सत्तांतरानंतर गेल्या वर्षभरात आमदार अमोल खताळ यांच्याकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या बद्दल करण्यात आलेले आक्षेपार्ह विधाने, एका कीर्तनकाराने थोरात यांना दिलेली धमकी, संगमनेर शहरात अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर झालेला शिरकाव, संगमनेर शहराचे पिण्याचे पाणी पूर्वेकडे पळविले जाण्याची चर्चा याचा प्रभाव या निवडणुकीतून दिसून आला. थोरात तांबे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष संघटना यांना एकत्र करून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाच्या नावाने व प्रचारात सेवा समिती नावाने ही निवडणूक लढविण्यात आली.

Comments are closed.