- तरलतेच्या गंभीर समस्येनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कारवाई
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
तरलतेच्या गंभीर समस्येनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेवर पुढील सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार, ग्राहकांना त्यांच्या कोणत्याही खात्यामधून केवळ ३४,००० रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे.
बँकेच्या तरलतेच्या स्थितीमुळे सादर कारवाई अनिवार्य ठरली असून ठेवीदार हित आणि बँकेच्या आर्थिक स्थैर्याचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पत्रामध्ये म्हटले आहे. नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेने निर्बंधांविषयी माहिती देण्यासाठी संबंधित आदेश बँकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करावा. बँकेच्या स्थितीवर नियमितपणे पुनरावलोकन करण्यात येवून आवश्यकतेनुसार निर्बंधांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू राहतील, त्यानंतर पुनरावलोकनानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. बँकेचा परवाना रद्द केला नसल्याचेही रिझर्व्ह बँकेने पत्रात स्पष्ट केले आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे पत्र मिळाल्याचे महिला विकास सहकारी बँक प्रशासनाने मान्य केले असून, सभासदांनी घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.