NGN News
Latest Marathi News

नाशिक–पुणे रेल्वे मार्ग थेट हवा; नव्या आराखड्याचा पुनर्विचार करा

खा. राजाभाऊ वाजे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या नव्याने जाहीर झालेल्या शिर्डीमार्गे वळवलेल्या आराखड्याचा तातडीने पुनर्विचार करून सिन्नर–संगमनेर–नारायणगाव–मंचर–चाकण मार्गे थेट नाशिक–पुणे जोडणी द्यावी, अशी ठाम मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ पराग प्रकाश वाजे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खासदार वाजे यांनी बुधवारी (दि. 10) नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्रींची भेट घेऊन जनतेच्या भावना प्रत्यक्षरित्या मांडल्या. या भेटीत नाशिक आणि पुणे या दोन महत्त्वपूर्ण औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी केंद्रांदरम्यान थेट रेल्वे जोडणीची दशकांपासूनची मागणी आता निर्णायक टप्प्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, GMRT संवेदनशील क्षेत्र टाळण्याच्या कारणामुळे मार्ग बदलला जात असला तरी मूलभूत प्रश्न कायम राहील असे नमूद केले.

अलीकडील संसदेत उत्तर देताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रस्तावित रेल्वे मार्गाला शिर्डी आणि अहिल्यानगरमार्गे वळवण्याचा निर्णय घेतला असून, नारायणगावजवळील Giant Metrewave Radio Telescope (GMRT) च्या संवेदनशील रेडिओ-क्षेत्रामुळे हा बदल करण्यात आल्याचे स्पष्ट म्हंटले होते. मात्र, या वळवलेल्या मार्गामुळे प्रकल्पाचा मूळ हेतू, प्रवासाचा कालावधी आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने होणारी प्रचंड हानी याकडे लक्ष वेधत खासदार वाजे म्हणाले “नाशिक–पुणे हा मार्ग महाराष्ट्राच्या औद्योगिक त्रिकोणाचा कणा आहे. लाखो प्रवासी, कामगार, विद्यार्थी आणि शेतकरी या दोन शहरांदरम्यान दैनंदिन प्रवास करतात. शिर्डीमार्गे वळवणीमुळे या सर्वांच्या हितावर गदा येणार आहे.” त्यामुळे हा मार्ग थेटच असावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

इंजिनिअरिंग उपायांद्वारे GMRT संवेदनशीलतेचे समाधान शक्य

जगभरात संवेदनशील वैज्ञानिक केंद्रांसोबत अनेक मोठ्या वाहतूक संरचना सहअस्तित्वाने चालतात, हे नमूद करत खासदार वाजे यांनी पर्यायी अभियांत्रिकीय उपाय, संरक्षणात्मक तंत्रज्ञान व समायोजित मार्गनियोजनाद्वारे GMRT क्षेत्राचे रक्षण करत थेट नाशिक–पुणे मार्ग शक्य आहे असे सांगितले. त्यामुळे, वळवलेल्या नव्या आराखड्याचा पुनर्विचार करून, तज्ज्ञ समितीकडून वैज्ञानिक, तांत्रिक व सामाजिक दृष्टिकोनातून नव्याने मूल्यमापन करावे, अशी त्यांची मुख्य मागणी आहे.

—–

@ या प्रकल्पासाठी मागील दीड वर्षात सातत्याने आग्रही आहे. त्याच फलस्वरूप म्हणून प्रकल्पाबाबत किमान प्रक्रिया तरी सुरू झाली. मात्र, प्रकल्प इतर मार्गाने होत असेल तर त्याचा मूळ उद्देश अर्थात औद्योगिक आणि कृषी क्षेत्राची उन्नती हेच पूर्ण होणार नसेल तर काय उपयोग?

: राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

Comments are closed.