NGN News
Latest Marathi News

खान अकॅडमीकडून शिक्षकांसाठी ‘खानमिगो’ एआय शिक्षण सहाय्यक उपलब्ध 

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

खान अकॅडमी इंडियाने आज ‘खानमिगो’ हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित शिक्षण सहाय्यक आता मराठी भाषेत उपलब्ध झाल्याची घोषणा केली आहे. यामुळे, महाराष्ट्रातील शिक्षकांना खानमिगो इंग्रजी, हिंदी आणि ओडिया भाषांसह आता त्यांच्या दैनंदिन वापरातील मराठी भाषेतही पूर्णपणे मोफत वापरता येणार आहे.

नोव्हेंबर 2024 मध्ये ‘खानमिगो’ प्रथमच भारतीय शिक्षकांसाठी सादर करण्यात आला. तेव्हापासून, हा एआय-आधारित सहाय्यक शिक्षकांना पाठ योजना, विद्यार्थी योजनांची निर्मिती आणि वर्गातील विद्यार्थ्यांसह अधिक चांगला संवाद साधण्यास मदत करत आहे. यामुळे देशभरातील हजारो शिक्षकांचा इतर कामात लागणारा वेळ कमी करून, विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

स्वाती वासुदेवन, व्यवस्थापकीय संचालक, खान अकॅडमी इंडिया, म्हणाल्या: “शासकीय शाळांमधील शिक्षकांवर अनेकदा शैक्षणिक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा ताण असतो. खानमिगो एक आधार देणारा अध्यापन सहकारी म्हणून काम करून, हा ताण कमी करण्यास मदत करतो. खानमिगो मराठीत सुरू करणे, हे शिक्षकांना त्यांच्या दैनंदिन भाषेत सेवा देण्याच्या आमच्या मोठ्या वचनबद्धतेचा भाग आहे. येत्या काही महिन्यांत आम्ही आणखी भारतीय भाषांमध्ये विस्तार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”

महाराष्ट्रातील शासकीय शाळांमध्ये खान अकॅडमीचा वापर:

महाराष्ट्र राज्य शासनामार्फत सर्व शासकीय शाळांमध्ये खान अकॅडमीचा वापर केला जातो. शिक्षकांनी त्यांच्या खान अकॅडमी शिक्षक खात्यावर लॉग इन करून, भाषा म्हणून मराठीची निवड केल्यास त्यांना खानमिगो वापरता येईल. आज, महाराष्ट्रातील 30,000 हून अधिक शाळांमध्ये शासकीय शाळेतील 10 लाखांहून अधिक विद्यार्थी खान अकॅडमी व्यासपीठावर नोंदणीकृत आहेत आणि सुमारे 1.8 लाख विद्यार्थी सक्रियपणे शिकत आहेत. शेल आणि कॉग्निझंट फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राज्यामध्ये उच्च-गुणवत्तेचे गणित आणि विज्ञान शिकण्याचे स्रोत उपलब्ध करून देण्यास मदत करत आहे.

मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने ‘खानमिगो’ जागतिक स्तरावर सादर करण्यात आला आहे. हे पाऊल जगभरातील शैक्षणिक वर्गांमध्ये परिवर्तनकारी आणि मोफत शिक्षण साधने पोहोचवण्याच्या खान अकॅडमीच्या ध्येयाचे प्रतीक आहे. 40 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध असलेला खानमिगो, शिक्षकांना अध्यापनात एआय चा अर्थपूर्ण आणि जबाबदारीने वापर करण्यास मदत करत आहे.

Comments are closed.