NGN News
Latest Marathi News

‘इनोव्हा’ खोल दरीत कोसळली; सप्तशृंगी गडावर पाच देवी भक्तांचा मृत्यू

  • मृत पिंपळगाव बसवंतचे रहिवासी ; धोकादायक वळणावरून गाडी खाली कोसळली

** रघुवीर जोशी

सप्तशृंगगड | एनजीएन न्यूज नेटवर्क

देवी सप्तशृंगीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना आज सप्तशृंगगड घाट मार्गावर घडली. रतनगड परिसरातील पिकनिक पॉईंटजवळ पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील भाविकांची इनोव्हा कार अचानक नियंत्रण सुटून सुमारे 800 ते 1200 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात कारमधील पाच देवी भक्तांचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण सप्तशृंगगड परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, वाहन क्रमांक MH 15 BN 0555 हे आज दुपारी सप्तशृंगगडावरून देवीचे दर्शन घेऊन जात असताना घाटातील धोकादायक वळणावरून गाडी कमजोर असलेली सौरक्षण भिंत तोडून दरीत गेली. कारमध्ये एकूण सात प्रवासी होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन पुरुष व चार महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच नांदुरी, सप्तशृंगगड येथील स्थानिक ग्रामस्थ, पोलिस, आपत्कालीन सेवा व आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत खोल दरीत वाहन कोसळल्यामुळे बचावकार्य करताना पथकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, ही दुर्घटना पाहण्यासाठी घाट मार्गावर बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली. दुर्घटनेचे दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला होता. या भीषण घटनेनंतर घाट रस्त्यावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. योग्य संरक्षक भिंती, मजबूत कटारे, स्पष्ट चेतावणी फलक आणि नियमित देखभाल नसल्यामुळेच असा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थ व भाविकांनी केला आहे. “कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही घाट रस्त्यावरील कामे केवळ देवीच्या भरोशावर सोडली गेली आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

या संदर्भात सप्तशृंगगड ग्रामपंचायत उपसरपंच संदीप बेनके आणि ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर गंभीर आरोप केले. “वेळोवेळी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत निवेदने, आंदोलने व रस्ता रोको करण्याबाबत निवेदन दिल्या असूनही बांधकाम विभागाने ग्रामस्थांना तुच्छ लेखले. आज पाच भाविकांचा बळी गेला असून याला संपूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे,” असा आरोप उपसरपंच संदीप बेनके व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी व सप्तशृंग गडावरील ग्रामस्थांनी केला. त्यांनी याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.

मृतांची नावे अशी :
कीर्ती पटेल (वय 50), रसीला पटेल (वय 50), विठ्ठल पटेल (वय 65), लता पटेल (वय 60), पचन पटेल (वय 60) आणि मणिबेन पटेल (वय 60). हे सर्व निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी असल्याची माहिती , अशी माहिती मिळत आहे. (मृतांची अंतिम अधिकृत यादी पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.)

पोलिसांनी अपघाताचा पुढील तपास सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचे काम आणि घटनेच्या नेमक्या कारणांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सप्तशृंगगड व नांदुरी परिसरात शोक आणि संतापाची भावना दोन्ही पाहायला मिळत आहेत.

Comments are closed.