NGN News
Latest Marathi News

‘सागरा प्राण तळमळला..’ काव्याला ११५ हून अधिक वर्षे; अंदमानात देशभक्ती सोहळा

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे १२ रोजी अनावरण
  • संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोहळा
  • महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांची सन्माननीय उपस्थित
  • पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, शरद पोंक्षे, रणदीप हुडा, डॉ. विक्रम संपत निमंत्रित

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

“सागरा प्राण तळमळला…” या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी सागरांच्या लाटांना साक्षी ठेऊन रचलेल्या या महान काव्याला ११६ वर्षे उलटली आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून ‘व्हॅल्युएबल ग्रुप’तर्फे १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता श्री विजया पुरम, पोर्टब्लेअर येथे “सागरा प्राण तळमळला” या विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बियोदनाबाद येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते आणि केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक ‘व्हॅल्युएबल ग्रुप’चे संचालक श्री अमेय हेटे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा साकारण्यात आला आहे. वि. दा. सावरकरांच्या राष्ट्रनिष्ठा, त्याग आणि निर्भय चिंतनाचे हे सजीव प्रतीक ठरणार आहे.हा पुतळा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या श्री राम सुतार यांनी डिझाइन करून साकारलेली आहे.

या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे साँस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांची सन्माननीय उपस्थिती राहणार असून, या कार्यक्रमाला इतरही क्षेत्रांतील मान्यवर हजर राहणार आहेत. यामध्ये पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर, श्रीमती उषा मंगेशकर, अभिनेता रणदीप हुडा आणि इतिहासकार-लेखक डॉ. विक्रम संपत, प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचा समावेश आहे.पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर यांच्या सुरेल, भावपूर्ण सादरीकरणामुळे या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढणार असून, सावरकरांच्या साहित्यिक वारशाला एक अनोखी, संगीतबद्ध आदरांजली ‘व्हॅल्युएबल ग्रुप’तर्फे दिली जाणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान वीर सावरकरांनी रचलेले महान काव्य ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला…’ याचे विशेष सादरीकरण होणार आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली जयोस्तुते…, जय जय शिवराया…, हे हिंदू नृसिंहा..’ अशी गाणीसुद्धा सादर होणार आहेत.या सादरीकरणा मधून स्वातंत्र्यवीरांच्या मातृभूमीप्रेमाची उत्कट भावना पुन्हा एकदा आसमंतात दुमदुमून उठेल.”हा सोहळा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरक इतिहासाला विनम्र अभिवादन आहे. पुढील पिढ्यांच्या मनामनात देशभक्तीची ठिणगी प्रज्वलित करण्याचा हा एक सशक्त प्रयत्न आहे. हा सोहळा आमच्यासाठी केवळ सन्मान नाही, तर राष्ट्रसेवेची प्रेरणा आहे.” असे ‘व्हॅल्युएबल ग्रुप’चे संचालक श्री अमेय हेटे म्हणाले.या संपूर्ण सोहळ्याचे संयोजन ‘मेराक  इव्हेंटसच्या सौ. मंजिरी हेटे करीत आहेत.

Comments are closed.