NGN News
Latest Marathi News

रोहित पवार यांना नाशिक न्यायालयाकडून हजर राहण्याचे आदेश

मंत्री माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरण; बाजू मांडण्याचे निर्देश

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची बदनामी केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. याच अनुषंगाने येत्या 9 डिसेंबरला रोहित पवार यांना नाशिक न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

विधान परिषदेत तत्कालीन कृषिमंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे सभागृहातील कामकाज सुरू असताना मोबाईलवर ‘ऑनलाइन रमी’ हा जुगार खेळत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून कोकाटे यांच्यावर टीका केली होती. त्या व्हिडीओमध्ये माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचा दावा करण्यात आला होता. यासंदर्भात सडकून टीका झाल्यानंतर कोकाटे यांच्या कृषी खात्यावर संक्रांत येवून त्यांना क्रीडा मंत्रालय देण्यात आले. हा व्हिडीओ खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचा आरोप करत कोकाटे यांनी रोहित पवार यांच्या विरोधात नाशिक न्यायालयात बदनामीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने यापूर्वीच पोलिसांना दिले होते. आता न्यायालयाने थेट आमदार रोहित पवार यांना न्यायालयात उपस्थित राहून बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. रोहित पवार यांना 9 डिसेंबरला नाशिक न्यायालयात हजर राहावे लागणार आहे

Comments are closed.