NGN News
Latest Marathi News

सिन्नर औष्णिक प्रकल्पावर एनसीएलटीची मोहर; प्रकल्प महजेनकोकडेच

सिन्नर : एनजीएन न्यूज नेटवर्क

दिवाळखोरीत गेलेल्या सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड (STPL) प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाला दीर्घ प्रतिक्षेनंतर गती मिळाली असून, एनटीपीसी आणि महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी (महाजनको) यांनी संयुक्तरीत्या सादर केलेल्या रिझोल्यूशन प्लॅनला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने 28 नोव्हेंबर रोजी अधिकृत मंजुरी दिली. यामुळे 1,350 मेगावॅट क्षमतेचा हा मोठा औष्णिक प्रकल्प पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सततच्या पाठपुराव्याचे हे यश मानले जात आहे.

सिन्नरमध्ये उभारलेला हा महत्वाचा प्रकल्प खासगी क्षेत्रात जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने, तो शासकीय ताब्यातच राहावा यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी मागील वर्षभर सातत्याने पाठपुरावा केला होता. नोव्हेंबर 2024मध्ये एकलहरे येथील औष्णिक केंद्राबाबत “प्रकाशगड” मुंबई येथे झालेल्या बैठकीत तत्कालीन महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक अनबलगल यांना प्रकल्प निलावात गेल्यास त्यात सहभाग घ्यावा, व प्रकल्प महाजनकोकडूनच चालवावा अशी मागणी खासदार वाजे यांनी प्रथमच मांडली होती. या मागणीनंतर त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या स्तरावर पत्रव्यवहार, निवेदने, आणि थेट मंत्रालयीन संवाद यातून पाठपुरावा तीव्र केला. परिणामी निलाव प्रक्रियेत महाजनको–एनटीपीसी कंसोर्टियमने तब्बल साडेतीन हजार कोटींहून अधिक बोली लावून सर्वाधिक पात्र बोलीदार म्हणून आघाडी घेतली. त्या वेळीच हा प्रकल्प शासकीय ताब्यातच जाणार हे निश्चित झाले होते.

दिवाळखोरीनंतरची निर्णायक घडी

पूर्वीच्या मालकांच्या मोठ्या वित्तीय देणग्यांमुळे STPL दिवाळखोरी प्रक्रियेत गेला होता. ऑक्टोबर 2024मध्ये विविध महत्त्वाच्या कंपन्यांनी प्रकल्प विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, औद्योगिक क्षेत्रातील वाढती वीज मागणी, सिन्नर एमआयडीसीतील उद्योगांचे हित आणि स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्‍न लक्षात घेता, केंद्र व राज्य पातळीवर प्रकल्प शासनाकडेच राहण्याची आवश्यकता अधोरेखित केली जात होती. जून 2025मध्ये कर्जदार समितीने महाजनको–एनटीपीसीचा प्लॅन मंजूर केला आणि अखेर NCLT ची अंतिम मुहर लागून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली.

स्थानिक रोजगार आणि औद्योगिक विकासाला दिलासा

सिन्नर तालुक्यातील गुळवंच व मुसळगाव शिवारात उभारलेला हा 1,350 मेगावॅटचा मोठा प्रकल्प पुन्हा सुरू झाल्यास स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी, औद्योगिक वसाहतींना स्थिर वीजपुरवठा, उत्तर महाराष्ट्रातील ऊर्जासाखळीला बळ, तसेच सिन्नर आणि नाशिक परिसरातील औद्योगिक गुंतवणुकीला नवी गती मिळणार आहे. महाजनको आणि NTPC या दोन्ही कंपन्यांचा मोठ्या प्रकल्पांच्या निर्मिती व व्यवस्थापनातील कौशल्याचा अनुभव लक्षात घेता, STPL च्या पुनरुज्जीवनाला अपेक्षित वेग प्राप्त होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

—–

सिन्नर प्रकल्प कोणत्याही खासगी कंपनीकडे जाऊ नये, स्थानिकांना रोजगाराची हमी मिळावी आणि प्रकल्प दीर्घकाळ सुरळीत चालण्यासाठी तो महाजनकोकडेच राहावा, हा माझा ठाम आग्रह होता. त्यासाठी मी सातत्याने राज्य व केंद्र स्तरावर पाठपुरावा केला. त्याचे फलित आज दिसत आहे. काही महिन्यांत प्रकल्प सुरू होईल आणि सिन्नरच्या औद्योगिक व आर्थिक वाढीस नवी ऊर्जा मिळेल.”

: राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

औद्योगिक क्षेत्रासाठी टर्निंग पॉईंट

ऊर्जा तज्ज्ञांच्या मते, महाराष्ट्रातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित होणे राज्याच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी निर्णायक ठरणार आहे. सिन्नर सारख्या औद्योगिक पट्ट्यातील गुंतवणूकदारांना दीर्घकालीन आश्वस्त वीजपुरवठा मिळाल्यास नाशिक जिल्ह्याचा औद्योगिक नकाशा अधिक विस्तारेल. त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. तसेच, अर्थकारणाला देखील बळकटी मिळणार आहे.

Comments are closed.