देवळा तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात हृदयद्रावक घटना
** पंडित पाठक
लोहोणेर : एनजीएन न्यूज नेटवर्क
आधी पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर तरुणाने स्वतः गळफास घेत आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना देवळा तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात रविवारी सकाळी घडली आहे. हे कृत्य करण्याआधी तरुणाने व्हाटसअप स्टेटसवर चौघांचे फोटो ठेवत भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्त टाकली. या घटनेने देवळा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत देवळा पोलिसानी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमध्ये ४० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तसेच पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा यांची हत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. या सर्वांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील गोविंद बाळू शेवाळे (वय ४०) यांचा मृतदेह गळफास घेत असलेल्या अवस्थेत आढळला आहे. तर पत्नी कोमल गोविंद शेवाळे (वय ३५),मुलगी ख़ुशी गोविंद शेवाळे (वय ८) आणि मुलगा शाम गोविंद शेवाळे (वय दीड वर्ष) यांचे मृतदेह पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. तरुणाने आधी पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेत आयुष्य संपवले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कॉनस्टेबल हे घटनास्थळी तातडीने दाखल झाले . याशिवाय अधिक तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी हजर झाली असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. या घटने बाबत अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात येत असून सदर प्रकार नक्की कशामुळे घडला असावा या बाबत निश्चित अशी माहिती अद्याप प्राप्त झाली नाही.
Comments are closed.