NGN News
Latest Marathi News

सत्तातुराणां भयं न पर्वा ( सारीपाट / मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याचे चांदा ते बांदा दरम्यान प्रत्ययास येत असलेल्या नेतेमंडळींच्या मौखिक श्रीमंतीतून अधोरेखित होत आहे. विरोधी महाविकास आघाडी जणू लोप पावली आहे आणि महायुती घटक पक्षच सत्ता सोपानावर विराजित होण्यास आतुर असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक व्यवस्थेतील हा ‘ट्रेलर’ इतका हिट ठरतोय तर अजून जिल्हा परिषदा-महापालिकांचा मुख्य ‘पिक्चर तो अभी बाकी है’. गेल्या वर्षी देवाभाऊ राज्याचे मुखिया बनल्यानंतर महायुतीत, विशेषतः भाजप-शिन्देसेना यांच्यातील, सुप्त लढाईचा आताशी उलगडा होऊ लागला आहे. किंबहुना, भविष्यात महायुती दुभंगण्याचे हे बीजारोपण ठरल्यास नवल वाटू नये.

राज्यात ऐन हिवाळ्यात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. काही ठिकाणी शिवसेना उबाठा पक्ष तर काही ठिकाणी कॉंग्रेस अस्तित्वापोटी निवडणूक मैदानात उतरली आहे. पण एकूण नूर पाहता निवडणुकीत महायुतीचे घटक असलेले भाजप, शिन्देसेना आणि राष्ट्रवादी ( एपी ) कॉंग्रेस हे पक्षच परस्परांना धारातीर्थी पडण्याच्या इर्षेने प्रचारसभांचे फड गाजवता आहेत. त्यांच्यापेक्षा आम्ही कसे लायक, सरस आणि ‘पीपल कनेक्टेड’ आहोत, हे मतदारांना पटवून देण्यात सगळेच अग्रदूत बनले आहेत. राज्याचा गाडा हाकण्यासाठी एकत्रित मिळालेल्या ‘जनादेशा’ला अव्हेरून या नेतेमंडळीना स्थानिक स्तरावरील या निवडणुका जिंकण्याचे खूळ विपरीत वळणावर घेवून चाललेय, याचा सर्रास विसर पडतोय. अगदी मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्रीद्वय, मंत्रीगण, प्रदेशाध्यक्ष असे सारेच बाह्या सावरत ‘स्वयंसिद्धते’चा गजर करताना दिसताहेत.

या प्रचारशैलीचा तौलनिक अभ्यास केल्यास काही बाबी, निवडक वक्तव्ये, निष्कर्ष काढण्याइतपत सबळ ठरावीत. विधानसभेत काही अपक्षांसह १४० संख्याबळाच्या जवळ पोहचलेल्या भाजपला आता कुबड्या नको आहेत, हे भाजप चाणक्य अमित शहा यांच्या सूचक वक्तव्याची एकनाथ शिंदे आणि मंडळीला पुरती कल्पना आली आहे. महायुतीचा तिसरा घटकपक्ष असलेला राष्ट्रवादी ( एपी ) कॉंग्रेस पक्ष कोणतीही कुरबुर न करता काही अपरिहार्यतेतून भाजपसोबत द्वंद्व छेडणार नाही याची भाजप नेतृत्वाला पुरती कल्पना आहे. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांकडे भरभक्कम बहुमत आहे. दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही. अशावेळी एकाकी पडण्यापेक्षा सत्तेत लाथा खाल्लेल्या बऱ्या, या विचाराने शिन्देसेना स्वतःहून सत्तेबाहेर जाणे अशक्यप्राय वाटते. भाजपकडे आणखी उणेपुरे चार वर्षे शिल्लक आहेत. या काळात वरचढ होऊ पाहणाऱ्या एकनाथ शिंदे यांना विविधांगी मार्गाने जेरीस आणण्याचे पुरते प्रयत्न दिल्लीश्वरांच्या कृपादृष्टीत करण्यात देवाभाऊ कसूर सोडणार नाहीत. शिवसेना संस्कारात वाढलेले शिंदेंचे मंत्री सत्तात्यागाच्या कितीही गोष्टी करीत असले तरी प्रत्यक्षात सत्तेतील छत्र-चामरे गळून पडल्यास काय हलत होऊ शकते, याची त्यांना जाण आहे. चौकशीच्या फेऱ्यांत सापडू शकणारे शिन्देन्पासून अर्धेधिक आमदार पक्षात असल्याने या पक्षाकडून तशी छाती होणे तूर्तास अशक्यप्रायच वाटते. जी गोष्ट शिंदेंची, तीच अजित पवारांची. म्हणूनच भाजप दोघांचीही मोजदाद करीत नसल्याचे स्पष्ट आहे.

सारांशात, महायुती सरकारची मोडतोड सध्या तरी शक्य वाटत नाही. मन आणि मतभेदांनी कळस गाठला आहे. पण सत्तेची ऊब हा ‘कॉमन अजेंडा’ सर्वाना त्या विपरीत विचारापासून परावृत्त करणारा आहे. गेल्या सलग तीन विधानसभा निवडणुकांत, जागांची शंभरी पार करण्यात यशस्वी होत असल्याने भाजपची आत्मविश्वास पातळी कमालीची वाढली आहे. सर्वार्थाने ‘सुरक्षित झोन’ मध्ये असलेल्या पक्षाला २०२९ ची निवडणूक बहुधा स्वबळावर लढण्याची महत्वाकांक्षा खुणावतेय. सवंगड्यांची तशी मानसिकता तयार करण्याची रंगीत तालीम आताच्या निवडणूक प्रचारातून उधृत होताना दिसतेय. उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही उलटफेर अनुभवयास आला तर तोदेखील २०१९ आणि २०२२ मधील घटनाक्रमांचा पुढील अंक असेल, इतकेच !

‘आबा’ साशंक वाटले म्हणून ‘काका’ही गळी लावले !

आधी कोकाटे, पाठोपाठ झिरवाळ आणि अखेर मालेगावच्या भुसेंना देखील भाजपने पर्याय शोधत आपल्या मोहिमेचे वर्तुळ पूर्ण केले. उदय सांगळे, रामदास चारोस्कर यांच्याप्रमाणेच बंडूकाका बच्छाव यांच्यासाठी साग्रसंगीत ‘रेड कार्पेट’ टाकून त्यांना मनोभावे कमळावर स्वार करून घेण्यात आले. काकांच्या बारा बलुतेदार संघटनेचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्यात ‘संकटमोचक’ यशस्वी ठरले. आधी पक्षात पावन करून घेतलेल्या अद्वयआबा हिरे यांचे आव्हान बहुधा साशंक वाटल्याने विधानसभेत भुसेंना टक्कर दिलेल्या बंडूकाकांना आपलेसे करण्यात भाजप नेतृत्वाने शहाणपण दाखवले असावे. भुजबळ यांच्या समकक्ष प्रतिस्पर्धी सापडत नसल्याने म्हणा किंवा भविष्यात ते ‘आपले’ होऊ शकतात, या विश्वासाने त्यांना सक्षम पर्याय पाहण्याची भाजप बहुधा तसदी घेत नसावा.

मालेगावच्या हिरे घराण्याची राजकीय सद्दी संपवण्याचे श्रेय खरेतर दादा भुसे यांना जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या भुसे यांचे पक्षाहून स्वतःचे असे मतदारसंघात वलय आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ‘चीतपट’ करण्याचे सर्व बाजूंनी प्रयत्न होवूनही ते विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले. म्हणूनच त्यांना तोलामोलाचा प्रतिस्पर्धी शोधण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु होते. आधी हिरे घराण्यातीलच अद्वय आबा यांना पक्षात पुनर्प्रवेश देवून भाजपने भुसे यांना डिवचले. पाठोपाठ कधीकाळी त्यांचेच ‘शिष्योत्तम’ बंडूकाका बच्छाव यांना गळाला लावले. आबा-काकांची भाजपातील ‘एन्ट्री’ मालेगावच्या राजकारणातील संघर्षमय राजकारणाची नांदी ठरते का, हे येणारा कालच ठरवेल.

Comments are closed.