NGN News
Latest Marathi News

डोंगराळे येथील बालिका हत्येच्या निषेधार्थ लासलगावात मोर्चा

  • विद्यार्थिनींसह महिलांचा लक्षणीय सहभाग; पोलीस ठाण्यात निवेदन सादर

** राकेश बोरा

लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

डोंगराळे येथील साडेतीन वर्षीय बालिकेच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ व हे कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी लासलगाव पंचक्रोशी सह शहरातील विविध शैक्षणिक संस्था,सामाजिक,राजकीय संघटनांकडून या घृणास्पद घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी लासलगाव शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात विद्यार्थिनी तसेच महिलांचा सहभाग लक्षणीय होता. 

शनिवारी सकाळी दहा वाजता शहरातील बाबा अमरनाथ मंदिर एस टी डेपो पासून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली.मुख्य रस्त्यावरून जात असताना डोंगराळे येथील चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे,आरोपीला फाशी द्या,न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील असे फलक हातात घेऊन विद्यार्थिनी मोर्चात सहभागी झाले होते.मोर्चा पोलीस ठाण्यात आल्यानंतर सदर खटला जलद गती न्यायालयात चालवत आरोपीस तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन लासलगाव पोलीस ठाण्याचे स पो नि भास्कर शिंदे यांना उपस्थित विद्यार्थिनींच्या हस्ते देण्यात आले 

‘एका रात्रीत सरकार बदलते,एका रात्रीत नोटबंदी होते, तर मग बलात्कार करणाऱ्या नराधमाला तातडीने फाशी का होत नाही?’ असा संतप्त सवाल मोर्चात सहभागी झालेल्या श्रावणी आघाव,कल्याणी कोकणे,मृणाल सोनवणे,खतीजा तांबोळी,उमामा खान,सुवर्णा कटारे,श्रेया महाले,श्रद्धा जगताप या विद्यार्थिनींनी उपस्थित करत श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करून सदर घटनेतील आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली 

या निषेध मोर्चाच्या निमित्ताने शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने,व्यापार प्रतिष्ठाने एक तास बंद ठेवून मोर्चाला मोठा प्रतिसाद दिला.या वेळी लासलगाव पंचक्रोशीतील नागरिकांसह लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय,जिजामाता कन्या विद्यालय,श्री महावीर विद्यालय,नॅशनल उर्दू हायस्कूल,लासलगाव महाविद्यालय च्या विद्यार्थिनी तसेच विविध समाज घटक,महिला तसेच विविध शैक्षणिक,सामाजिक,राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.