- दरमहा ठरणार ऑफिसर ऑफ द मंथ ; उत्कृष्ट अधिकारी–कर्मचाऱ्यांचा गौरव
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषद नाशिकमध्ये कामकाजातील गुणवत्ता आणि सेवाभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ऑफिसर ऑफ द मंथ हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची निर्मिती झाली असून, प्रत्येक महिन्यात आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे छायाचित्र जिल्हा परिषद मुख्य इमारतीत प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केले जाईल. यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढेल, सकारात्मक स्पर्धेला चालना मिळेल आणि जनसेवेत उत्कृष्टता साधणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी सातत्याने विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करतात, त्यांचे काम इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे व त्यांचा सन्मान झाला पाहिजे. ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ हा उपक्रम त्याच दिशेने उचललेले एक पाऊल आहे. प्रशासकीय सेवेत जबाबदारी, नवोपक्रम, कार्यक्षमता व परिणामकारकता या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा संकल्पना अत्यंत आवश्यक आहेत.
Comments are closed.