शिवसेना उबाठा महिला आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नाशिक : फलटण (जि.सातारा) येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणात सहभागी असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रशासकीय त्रुटींची तातडीने उच्चस्तरीय नि:ष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलावीत या मागणीचे निवेदन शिवसेना उबाठा महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले.
डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून, त्यांनी मृत्यूपूर्वी स्वतःच्या तळहातावर नमूद केलेल्या मजकुरानुसार पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी त्यांच्यावर बलात्कार केला तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.तसेच तत्कालीन पोलीस अधिक्षक श्री.अनिल महाडिक व उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.राहु ल धस यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करुनही त्याकडे त्यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केलेले आहे.त्यामुळे महिलांसंबंधातील गुन्हे रोखण्याची आणि त्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांवरच असे आरोप होणे ही कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने अत्यंत चिंताजनक आणि राज्य प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणारी बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात पोलिसांकडूनच तक्रारीकडे दुर्लक्ष होणे, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास विलंब होणे, आणि प्राथमिक पातळीवर वस्तुनिष्ठ दृष्टिकोन न दिसणे या सर्व बाबी चौकशीच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित करतात. त्याच प्रमाणे पिडीत वैद्यकीय अधिकारी यांचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न काही समाजमाध्यमातून सुरु आहे. सदरहू बाब गंभीर स्वरुपाची असल्याचे निवेदनात पुढे म्हटले आहे.
निवेदनावर शिवसेना कोअर कमिटी सदस्य भारतीताई ताजनपुरे, शिवसेना महिलाआघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील, युवती सेना पदाधिकारी योगिता गायकवाड, महिला आघाडी पदाधिकारी शोभा दोंदे, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, राणी गवळी, शोभा वालझाडे, सुवर्ण काळुंगे, शारदा सपकाळ, शोभा दिवे, जयश्री खेताडे, बेबी मोरे, सिंधू वाघ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments are closed.