चांदोरी : एनजीएन न्यूज नेटवर्क
“शहरात मोठं झालो, पण मनानं कधीच गाव सोडलं नाही…” ही भावना आता कृतीत उतरतेय. चांदोरी गावातील ग्रामस्थ आणि बाहेरगावी स्थायिक झालेल्या तरुणांनी एकत्र येत गावाशी नातं घट्ट करण्याचा सुंदर प्रयत्न सुरू केला आहे.
शनिवार, दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा होणारा ‘चांदोरी गाव दिवस’ हा केवळ कार्यक्रम नाही, तर “आपलं मूळ विसरू नका” असा भावनिक संदेश देणारा सोहळा आहे. या उपक्रमामागील संकल्पना भूषण मटकरी यांची असून आयोजन ग्रामस्थ चांदोरी यांनी केले आहे.
शहरात नोकरी, शिक्षण, व्यवसाय करत असलेले चांदोरीकर या दिवशी गावाकडे परत येणार आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यातील शांतता, अंगणातल्या चुलीचा वास, आणि बालमित्रांची भेट या सगळ्यातून नात्यांची उब पुन्हा अनुभवण्याची संधी या दिवसात मिळणार आहे.
गावातील प्रत्येक गल्ली सजली आहे. जुनी शाळा, पाण्याचे टाकी, मंदिर, चौक सगळं पुन्हा जिवंत झालंय. या दिवशी पारंपरिक खेळ, छायाचित्र प्रदर्शन, गावगौरव सन्मान, आणि ‘आपलं गाव आपला विकास’ या विषयावर खुलं चर्चासत्र होणार आहे.
गावाबाहेर गेलेल्यांसाठी हा दिवस म्हणजे “आपल्या मातीशी संवाद साधण्याचा क्षण” आहे. शहरात झपाट्यानं बदलत जाणाऱ्या जीवनशैलीतून एक दिवस गावाकडे वळणं म्हणजे मनाला नवी ऊर्जा देणं.
चांदोरीकरांनी दाखवून दिलंय की, विकासाच्या शर्यतीत पुढं जातानाही गावाशी नातं तोडायचं नसतं उलट ते जपायचं, वाढवायचं आणि पुढच्या पिढीला सांगायचं.
२५ ऑक्टोबरला चांदोरीत साजरा होणारा हा ‘गाव दिवस’ केवळ एक सोहळा नाही, तर एक संदेश आहे
Comments are closed.