- एकाच दिवसात ६० रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा; 20 गुन्हे दाखल
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
शहरातील गुन्हेगारांना वठणीवर आणण्याची पोलिसांची मोहीम एकीकडे सुरु असताना आता बेशिस्त आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रिक्षाचालकांवर कायदेशीर कारवाईचा वरवंटा फिरवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार, वाहतूक शाखेने रस्त्यावर अराजक माजवणाऱ्या लक्ष केंद्रीत करून तब्बल ६० रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडवणारी अनेक कृत्ये रिक्षाचालकांकडून होत असल्याच्या मुद्द्यावर पोलीस खाते ठाम आहे. म्हणूनच भारतीय न्याय संहिता कलम 285 आणि मोटार वाहन कायद्यान्वये हे गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. रविवारी ( दि. २० ) केलेल्या कारवाईत 20 गुन्हे दाखल करण्यात येवून एकूण 60 रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. अनेक भागांत रिक्षाचालकांकडून सायंकाळी सातनंतर अयोग्य वर्तन, दारू पिऊन वाहन चालवणे, तसेच नियमांचे उल्लंघन होतो, याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, वाहतूक शाखेच्या उपायुक्त किरिधिका सी. एम. यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर तपासण्या सुरू केल्या. या कारवाईत सहाय्यक आयुक्त सुधाकर सुराडकर, अद्विता शिंदे, वाहतूक शाखेच्या सात युनिट्स, आणि शहरातील 13 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे रिक्षाचालकांशिवाय शहरात दहशत माजवणारे सराईत ट्रक व टॅक्सीचालक देखील कारवाईच्या कक्षेत आले आहेत. कोणत्याही वेळी रस्त्यावर सरप्राईज तपासणी करून त्यांच्यावर थेट गुन्हे नोंदवले जात आहेत.
कडक इशारे, समन्स पत्रांवर सह्या
कारवाईदरम्यान पोलिसांनी 60 पेक्षा अधिक रिक्षाचालकांची आधार कार्ड माहिती नोंदवली, त्यांना कडक इशारे देत, समन्स पत्रांवर सह्या घेतल्या, आणि नंतर त्यांच्या रिक्षा सोडण्यात आल्या. या कारवाईत नाशिकरोड, पंचवटी, सरकारवाडा, अंबड, देवळाली कॅम्प, मुंबई नाका पोलीस ठाण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Comments are closed.