- रक्कम रोखून धरण्यासही घातली बंधने
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
गेल्या सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी राज्य शासन आर्थिक मदत उपलब्ध करून देत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महत्वपूर्ण आदेश पारित केला आहे. त्यानुसार, कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाईची रक्कम कर्जखात्यात वर्ग करण्यास तसेच रक्कम रोखूनही धरण्यास बंधने घालण्यात आली आहेत. आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर थेट आपत्ती व्यवस्थापन अधिनियम तरतुदीनुसार गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सरकारकडून आर्थिक मदत लक्ष्मीपूजनापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पंचनाम्यांनुसार जिल्ह्यात 4 लाख 9 हजार 474 शेतकर्यांचे एकूण 2 लाख 88 हजार 806 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यान्वये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 317 कोटी 15 लाख 77 हजार रुपयांचे अनुदान प्रशासनाला प्राप्त झाले आहे.
आदेशाचे सोपस्कार यासाठी…
सरकारने देऊ केलेल्या मदतीची रक्कम ही बँकाकडून परस्पर कर्जखात्यावर वर्ग केली जाण्याची अथवा कर्जाचे हते थकल्याने बँकाकडून रोखून धरली जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे व्यवस्थापकांसाठी आदेश काढले आहेत.
Comments are closed.