NGN News
Latest Marathi News

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडून रेल्वे स्थानकांचा निरीक्षण दौरा

  • सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा आढावा

** पुरुषोत्तम कांडेकर

देवळाली कॅम्प : एनजीएन न्यूज नेटवर्क

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. विजय कुमार यांनी मुख्यालयातील प्रधान विभागप्रमुख, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत नाशिक रोड, देवळाली, ओढा, कसबे सुकणे आणि खेरवाडी या रेल्वे स्थानकांचे सविस्तर निरीक्षण केले.

या निरीक्षण दौऱ्याचा उद्देश भाविकांच्या सुरक्षित, सुलभ व सुगम प्रवासासाठी आवश्यक सुविधा, पायाभूत विकास व रेल्वे संचालन व्यवस्थांचा आढावा घेणे हा होता. सिंहस्थ मेळ्यादरम्यान देशविदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या दृष्टीने प्रवासी सुविधा, प्लॅटफॉर्मची क्षमता, स्वच्छता, पिण्याचे पाणी, तिकिट खिडक्या, माहिती प्रणाली, गर्दी व्यवस्थापन, होल्डिंग एरियाची तयारी तसेच रेल्वे ऑपरेशन्स यावर विशेष भर देण्यात आला.

विविध कामांचा आढावा

महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी नाशिक–भुसावळ खंडाचा विंडो ट्रेलिंग निरीक्षण करताना चालू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. यामध्ये रेल्वे रुळांची स्थिती, स्थानक परिसर, ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) यंत्रणा, लेव्हल क्रॉसिंग्स व महत्त्वाच्या सुरक्षा अधोसंरचनेचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. भुसावळ विभाग सिंहस्थ कुंभमेळा २०२७ यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांची सुरक्षा, सुविधा व सुरळीत वाहतुकीसाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारणीसह समन्वित पद्धतीने सातत्याने प्रयत्नशील आहे.

Comments are closed.