NGN News
Latest Marathi News

गुन्हेगारांना तिकीट नाकारणार; तक्रार सिध्द झाल्यास घरचा रस्ता : केदार

  • नाशिक भाजप शहर जिल्हाध्यक्षांचा फतवा; गुंडगिरी करणाऱ्यांची तक्रार करण्याचे आवाहन
  • आरोप सिद्ध झाल्यास बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याची स्पष्टोक्ती

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

यापुढे पक्ष नावाचा किंवा पदाचा वापर करून जर कोणी दादागिरी, गुंडगिरी, फसवणूक किंवा अन्य कुठलीही बेकायदेशीर कृत्ये करत असेल, तर त्याविरोधात भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात थेट तक्रार करा, असा फतवा भाजप शहर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी काढला आहे. आलेल्या  तक्रारींची शहानिशा करण्यात येईल आणि जर आरोप सिद्ध झाले, तर अशा व्यक्तींना पक्षातून तत्काळ बाहेरचा रस्ता दाखवला जाईल करण्यात येईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील गुन्हेगारी कारवायांची राज्यभर चर्चा होत आहे. यामध्ये राजकीय पार्श्वभूमी असलेल्या किंवा गुन्हेगारांना प्रत्यक्षाप्रत्यक्ष राजाश्रय देणाऱ्या व्यक्तींमध्ये भाजप नेत्यांचा समावेश उघड झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील कोणलाही, अगदी भाजपच्या लोकांनाही यासंदर्भात सोडू नका, असे निर्देश दिले आहेत. आगामी निवडणुकांत पक्षाला या पार्श्वभूमीचा फटका बसू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे तिकीट नाकारले जाणार असल्याची माहिती देखील केदार यांनी दिली.

‘शत-प्रतिशत’ अंमलबजावणी होईल ?

दरम्यान, भाजपने उचललेले पाऊल स्वागतार्ह असले तरी त्याची ‘शत-प्रतिशत’ अंमलबजावणी होईल का हा कळीचा प्रश्न आहे. कारण अलीकडे कमळावर स्वार झालेले इतर अनेक पक्षाचे नेते राजकीय बस्तान बसवण्यासाठीची सोय म्हणून भाजप प्रवेशाकडे पाहत आहेत. असे असताना नव्या शहर जिल्हाध्यक्षांच्या नव्या फतव्यामुळे नवगतांची राजकीय कोंडी होऊ शकते. भाजपशिवाय, प्रतिमा मलीन होऊ पाहणारे इतर पक्ष असा निर्णय घेतात का, याकडेही शहरवासियांचे लक्ष लागून राहणार आहे.

Comments are closed.