NGN News
Latest Marathi News

नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांना मिळणार रोगप्रतिकारक, उत्पादनक्षम वाण

  • ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनी-स्पेनच्या आयटीयूएम कंपनीमध्ये सामंजस्य करार
  • भारतीय द्राक्ष शेतीसाठी नवा मैलाचा दगड

** राकेश बोरा

लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

भारतीय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. निफाड तालुक्यातील उगाव येथील ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. यांनी स्पेनमधील नामांकित द्राक्ष वाण ब्रिडींग संस्था आयटीयूएम सोबत नवीन उच्च दर्जाच्या द्राक्ष वाण भारतात आणण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या कराराची माहिती कंपनीचे सर्वेसर्वा मधुकर गवळी यांनी दिली.

या करारावर मधुकर गवळी आणि कंपनीचे संचालक गणेश काळे यांनी आयटीयूएम कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत स्वाक्षऱ्या केल्या. हा करार भारतीय द्राक्ष उद्योगात “नवकल्पना, गुणवत्तावृद्धी आणि जागतिक स्पर्धात्मकता” वाढविण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे गवळी यांनी सांगितले.

सध्या भारतीय द्राक्ष उत्पादकांना पारंपरिक वाणांमुळे हवामानातील बदल, रोग-किडींचा प्रादुर्भाव, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आयटीयूएम कडून येणारी नवीन सुधारित वाण शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहेत.

हे वाण केवळ रोगप्रतिकारक आणि उत्पादनक्षम नसून, त्यांच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी राहील, असा विश्वास गवळी यांनी व्यक्त केला. या करारामुळे शेतकऱ्यांना जास्त उत्पादन, उत्कृष्ट दर्जाचे द्राक्ष आणि स्थिर, उच्च दराने नफा मिळविण्याचा मार्ग खुला होईल.

हा करार केवळ व्यावसायिक करार नसून, भारतीय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी शाश्वत शेती आणि विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल आहे. ओम गायत्री ग्रुपच्या या दूरदर्शी प्रयत्नामुळे आणि द्राक्ष क्षेत्रातील तज्ञांच्या सहकार्यामुळे भारतातील द्राक्ष शेतीला नवसंजीवनी मिळेल व ती जागतिक स्तरावर नवी उंची गाठेल, यात शंका नाही.

Comments are closed.