NGN News
Latest Marathi News

छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाची ज्ञान भेट उत्सवाशी सांगड

वाचन संस्कृतीची होणार जागृती ; शुभेच्छारुपी मिळालेली पुस्तके वाचनालयांना देणार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा येत्या १५ ऑक्टोबर रोजी ७९ वाढदिवस हा साधेपणाने साजरा होणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने वाचन संस्कृतीच्या जनजागृतीसाठी ज्ञानाच्या भेटीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.या वाढदिवसानिमित्त भुजबळ फार्म कार्यालय, नाशिक येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शुभेच्छुकांची भेट घेऊन सदिच्छा स्वीकारणार आहेत. परंतु यंदाचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम नसून ज्ञान आणि संस्कारांचा उत्सव ठरणार आहे.

नुकताच दि.९ ऑक्टोबर रोजी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छुकांनी पारंपरिक भेटवस्तूंऐवजी पुस्तके भेट देण्याचा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. त्या वेळी विविध विषयांवरील शेकडो पुस्तके जमा झाली आणि त्यातून एक समृद्ध साहित्यसंग्रह तयार झाला. तो संग्रह पुढे वाचनालयांना भेट देण्यात आला ही कृती म्हणजे ज्ञानदानाच्या संस्कृतीचा सुंदर नमुना ठरली. त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांचा यंदाचा वाढदिवस हा उपक्रम पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फुलांचा गुच्छ किंवा शाल न आणता पुस्तक भेट म्हणून द्यावी असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

या पुस्तक भेट उपक्रमातून जमा होणारी सर्व पुस्तके ग्रामीण भागातील वाचनालयांना भेट देण्यात येणार आहेत. अनेक ग्रामीण तरुणाईला, विद्यार्थी वर्गाला आणि वाचनप्रिय समाजघटकांना त्यामुळे ज्ञानाचे नवे दरवाजे उघडतील. आजच्या काळात मोबाईलच्या पडद्यावर अडकलेले मन पुन्हा एकदा पुस्तकांच्या पानांकडे वळावे, वाचनातून विचार आणि विचारातून परिवर्तन घडावे हाच या उपक्रमामागचा खरा हेतू आहे. वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हेतू मंत्री छगन भुजबळ यांनी वाढदिवसाशी जोडला आहे.

Comments are closed.