- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ग्रामपंचायतीला हिरवा कंदील
** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
गेल्या ३५ वर्षापासून अधिक काळ प्रलंबित असलेला लासलगाव शहरातील भव्य अश्वारूढ शिवरायांचा पुतळ्याला अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळाला असून लवकरच ग्रामपंचायत प्रांगणात अतिशय भव्य स्वरूपात या अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती माजी सरपंच जयदत्त होळकर यांनी दिली.
शिवरायांचा अश्वारूढ पुतळा होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात आला होता या संदर्भातील अनेक परवानग्या संकलन करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याला अखेर परवानगी देण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत प्रांगणात या शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी केली जाणार असून लवकरच याचे काम सुरू होणार आहे.
अश्वारूढ पुतळ्याची निर्मिती नाशिक येथील शिल्पकार आनंद सोनवणे यांच्यामार्फत केली जाणार असून ग्रामपंचायतच्या परिसर सुशोभीकरण व आकर्षक सजावट केली जाणार आहे. स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांना साथ देणाऱ्या शूरवीरांचे पुतळे या ठिकाणी उभारले जाणार आहेत. शिवरायांचा पुतळा पूर्ण उभारणी झाल्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती जयदत्त होळकर यांनी दिली. सदर पुतळा परवानगीसाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विशेष प्रयत्न केले आहेत
३५ वर्षांची प्रतीक्षा संपली..
लासलगाव शहरात अश्वारूढ शिवरायांचा पुतळा वावा साधारणपणे सन १९९० सालापासून यावर चर्चा सुरू होती. संदर्भात गेल्या ३/४ वर्षापासून ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तसेच मंत्रालयामध्ये रितसर परवानगी मिळण्यासाठी विविध अर्ज करण्यात आले होते त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातून दिनांक १० ऑक्टोबर रोजी दिलेल्या पत्रामुळे ही परवानगी देण्यात आल्याने अखेर ३५ वर्षानंतर शिवरायांच्या पुतळ्याचे काम सुरू होणार आहे.
भव्य दिव्य शिवरायांचा पुतळा साकारणार– जयदत्त होळकर, माजी सरपंच,लासलगाव
शहरात अतिशय भव्य शिवरायांचा पुतळा व्हावा ही अनेक वर्षांपूर्वीची इच्छा आता पूर्ण होणार असून सर्वांना हेवा वाटावा असा उत्कृष्ट नियोजन करून परिसराचे सुशोभीकरण करत भव्य अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी या ठिकाणी करण्यात येणार असून लवकरच त्याचे कामकाजास सुरूवात केली जाईल.
असा असणार शिवरायांचा पुतळा…
1) शिल्पकार : वास्तु शिल्प स्टुडीओ, मखमलाबाद, नाशिक
चित्रकार व शिल्पकार आनंद सोनवणे
चित्रकार व शिल्पकार विवेक सोनवणे
2 ) पुतळा उंची १६ फूट / १८०० mm
3) पंच धातू
पितळ ६०% – १२६० kg
तांब ३०% – ६३० kg
झिंक १० % २१०
चांदी ०.१ % – ५००० gm
सोन ०.००१ % – १५ gm
4) पुतळा वजन – २.१ टन / २१०० kg
Comments are closed.