महामार्गाची प्रचंड दुरवस्था ; काम पूर्णत्वापर्यंत टोलनाके बंद करण्याची मागणी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक-पुणे महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून ५ तासांचा प्रवास ८-९ तासांवर गेला आहे. या अनुषंगाने या महामार्गाचे कॉंक्रीटीकरणाचे काम धीम्या गतीने सुरु असून ते तातडीने पूर्ण करण्यात यावे आणि तोपर्यंत तीनही टोलनाके बंद करण्यात यावे, अशी मागणी आ. सत्यजित तांबे यांनी शासनाकडे केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० नाशिक-पुणे ची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यामुळे वाहनधारकांची कुचंबना होत आहे. चार-पाच तासांच्या नाशिक-पुणे प्रवासाला तब्बल ८-९ तास लागत आहेत. संगमनेर-पुणे प्रवासाला देखील ४ ते ५ तास तर संगमनेर-नाशिक प्रवासाला दोन तासाहून अधिक वेळ लागत आहे. त्यासाठी या महामार्गाचे कॉंक्रीटीकरण काम युद्धपातळीवर पूर्ण करणे गरजेचे आहे. आपण याआधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून जनभावना कानी घातल्या आहेत. अलीकडे पुन्हा गडकरी यांना याबाबत स्मरणपत्र देवून जातीने लक्ष घालण्याची विनंती केल्याचे आ. तांबे यांनी स्पष्ट केले.
जोपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे व्यवस्थित होत नाही अथवा त्याचे कॉंक्रीटीकरणाचे काम पूर्ण होत नाही, तोवर या महामार्गावरील तीनही टोलनाके बंद करण्यात यावे, अशी आग्रही मागणीही आ. तांबे यांनी केली आहे.
Comments are closed.