NGN News
Latest Marathi News

‘लेपर्ड सफारी संरक्षण प्रकल्प’ उभारा; खा. वाजेंचे केंद्राला साकडे

  • बिबट्या आणि मानव दोघांच्याही संरक्षणासाठी पुढाकार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून वाढत्या बिबट्या-मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संवेदनशील मुद्द्याची गंभीर दखल घेत खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली असून, नाशिकसाठी स्वतंत्र ‘लेपर्ड सफारी अँड कंझर्वेशन प्रोजेक्ट’ मंजूर करावा, अशी ठोस मागणी त्यांनी पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री मा. भूपेंद्र यादव यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

खासदार वाजे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “नाशिक जिल्ह्याचा निसर्गाशी सुसंवादाचा दीर्घ परंपरेचा वारसा आज भीतीच्या छायेत झाकोळला आहे. गेल्या पाच वर्षांत (२०२१–२०२५) बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे ३५हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ६२हुन अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मानवहानी बरोबरच पाळीव जनावरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले असून अधिकृत ₹६.१० कोटींची भरपाई वितरित करण्यात आली आहे. तरी सुद्धा बिबट्यांच्या हालचाली आणि हल्ल्यांचे प्रमाण कमी न होता वाढतच आहे.”

पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील ‘लेपर्ड सफारी प्रोजेक्ट’, तसेच सातारातील “माणिकडोह रेस्क्यू सेंटर” आणि राजस्थानमधील “जयपूर लेपर्ड रिझर्व्ह” ही यशस्वी उदाहरणे आहेत. अशा प्रकारचा समर्पित लेपर्ड सफारी आणि संवर्धन प्रकल्प नाशिकमध्येही उभारल्यास पर्यावरणीय संतुलन, पर्यावरण शिक्षण, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळू शकते.

——–

हा केवळ वन्यजीव व्यवस्थापनाचा प्रश्न नाही; हा मानवी सुरक्षिततेचा, पर्यावरणीय संतुलनाचा आणि सामाजिक सौहार्दाचा प्रश्न आहे. भीतीचे रूपांतर पुन्हा विश्वासात व्हावे यासाठी माझा प्रयत्न आहे. दीर्घकालीन तसेच अल्पकालीन तात्काळ अश्या दोन्हीही उपयोजनाबाबत शाश्वत काम सुरू आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली जात आहे.

  • राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

Comments are closed.