सरकारवर हल्लाबोल : मुख्यमंत्र्यांना निवेदन
सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क
ऐन दिपावलीसारख्या आनंदोत्सवाच्या काळात सरकारने “आनंदाचा शिधा” योजना बंद करण्याचा घेतलेला निर्णय हा गोरगरीबांच्या आयुष्यात काळोख पसरवणारा आहे. एकीकडे बाजारपेठांमध्ये दिवाळीची धामधूम सुरू असताना, दुसरीकडे गोरगरीब जनतेच्या घरांवर मात्र अंधार दाटला आहे. महायुती सरकारने गेल्या वर्षी निवडणुकांच्या तोंडावर सुरू केलेली ही योजना आता बंद करण्याचा निर्णय घेतल्याने “गरज सरो, वैद्य मरो” असा हा प्रकार असल्याची तीव्र प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत असून, शासनाने “आनंदाचा शिधा” योजना पुनश्च सुरू करावी, अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, प्रचंड महागाई आणि बेरोजगारीमुळे आधीच पिचून गेलेल्या सर्वसामान्यांच्या तोंडचा घास काढण्याचे पाप सरकार करत आहे. ‘आनंदाचा शिधा’ ही योजना म्हणजे गोरगरिबांसाठी दीपावलीचा खरा आनंद होती. पण आता त्यांच्या दिवाळीत प्रकाशाऐवजी नैराश्य भरले जाणार आहे.” शासनाने तात्काळ ‘आनंदाचा शिधा योजना’ पुन्हा सुरू करावी, जेणेकरून गोरगरीब जनतेची दिवाळी ‘आनंदात’ जाईल. नाहीतर जनता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकित मतदानपेटीतून धडा शिकवेल, असा इशाराही सौ.चव्हाण यांनी दिला आहे.
Comments are closed.