- आयुष प्रसाद असणार नवे जिल्हाधिकारी; शेखर सिंह कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्त
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, नाशिकची जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली होवून त्यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिक ( एनएमआरडीए ) च्या महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची नाशिकच्या कुंभमेळ्याचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शर्मा हेच जिल्हाधिकारीपदी राहतील, अशी अटकळ बांधली जात असताना त्यांची अचानक बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शर्मा यांची नाशिकमधील कारकीर्द उल्लेखनीय राहिली. त्यांनी अनेक बाबतीत दाखवलेली कर्तव्यकठोरता चर्चेत राहिली. त्यांच्याकडे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Comments are closed.