NGN News
Latest Marathi News

खगोलप्रेमींना ‘कोजागिरी’ च्या पार्श्वभूमीवर ‘सुपरमून’ पाहण्याची संधी

  • नेहमीपेक्षा १४% मोठा आणि ३०% अधिक तेजस्वी दिसणार चंद्र

** डॉ. दिलीप कोठावदे

नवीन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

गेल्या महिन्यात जगभरातील खगोल प्रेमींना ‘ब्लड मून’ अर्थात लाल चंद्र पाहण्याची संधी मिळाल्यानंतर,येत्या सोमवार दि. ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आकाशात ‘सुपरमून’ चे अद्भुत दर्शन होणार आहे. पौर्णिमेला नेहमी दिसणाऱ्या चंद्रापेक्षा हा चंद्र १४% मोठा आणि ३०% अधिक तेजस्वी दिसणार असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्यामुळे त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सतत बदलते असते. पौर्णिमेचा पुर्ण चंद्र जेव्हा पृथ्वीच्या सर्वात जवळच्या कक्षेत असतो, त्या स्थितीला ‘सुपरमून’ व त्या बिंदूला ‘पेरीजी’ म्हणतात. याउलट, जेव्हा तो सर्वात दूर असतो त्या स्थितीला ‘अपोजी’ म्हणतात. चंद्र पेरीजीजवळ असल्यामुळे, नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा जास्त मोठा आणि अधिक चमकदार दिसणार आहे.

भारतात सोमवार दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:४७ वाजता चंद्र आपल्या सर्वोच्च पौर्णिमेच्या टप्प्यावर असेल, परंतु चंद्राचे विलोभनीय दर्शन घ्यायचे असेल तर क्षितीजावर चंद्रोदयाच्या वेळी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पाहणे अधिक चांगले. कारण यावेळी तो अधिक मोठा व अतिशय सुंदर दिसेल.हा सुपरमून पाहण्यासाठी कोणत्याही उपकरणांची गरज नाही. आकाश निरभ्र असल्यास, तुम्ही तो सहज पाहू शकतात.

Comments are closed.