- पारंपरिक किर्तिध्वज सोहळा उत्साहात; गवळी कुटुंबाने जपली परंपरा
** रघुवीर जोशी
सप्तशृंगगड : एनजीएन न्यूज नेटवर्क
सप्तशृंगगडावर महानवमी ( दि. १ ) रोजी पंचामृत महापूजेनंतर किर्तिध्वज सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी जलज शर्मा व विश्वस्त भूषणराज तळेकर सपत्नीक पूजेसाठी उपस्थित होते. दुपारी ३.३० वाजता ट्रस्ट मुख्यालयात अध्यक्ष अभय लोहाटी यांच्या हस्ते ध्वजपूजा झाली. त्यानंतर दुपारी ४ वाजता सवाद्य मिरवणुकीने गड दुमदुमला.
परंपरेप्रमाणे दरेगाव येथील गवळी कुटुंबाने ११ मीटर लांबीचा भगवा ध्वज व पूजासाहित्य घेऊन ४५६९ फुट उंचीवरील शिखरावर चढाई केली. रात्री मध्यरात्री जुना ध्वज उतरवून विधिवत पूजा करून नवीन किर्तिध्वज फडकावण्यात आला. गवळी कुटुंब गेली अनेक वर्षे ही परंपरा जपत असून, जीवावर उदार होऊन होणारा हा सोहळा भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
गडावर “सप्तशृंगी माता की जय”च्या घोषात भक्तीचा महासागर लोटला होता. यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, एसडीओ महेश शेलार, पोलीस अधिकारी, विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंदिर सभामंडपात शतचंडी याग व होमहवन विधीही पार पडले. प्रशासन, पोलीस व ग्रामपंचायतीकडून भाविकांसाठी नियोजनबद्ध सोय करण्यात आली. दरम्यान, गुरुवार (२ ऑक्टोबर) रोजी विजयादशमी निमित्त कुमारिका पूजन, बलिपूजन, पूर्णाहुती व आरतीनंतर नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
Comments are closed.