NGN News
Latest Marathi News

शेतकऱ्यांनी पांढरा कांदा उत्पादन घ्यावे : सुवर्णा जगताप

कांदा धोरण समिती बैठकीत सूचना

** राकेश बोरा

लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

आज राज्यात मुख्यत्वे  कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, साठवणुकीमध्ये टिकणारा आणि निर्यातीस उपयुक्त पांढऱ्या कांद्याकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. पांढऱ्या कांद्याची मागणी देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही वाढत आहे. त्यामुळे भविष्यात शाश्वत नफा मिळवायचा असेल, तर शेतकऱ्यांनी पांढरा कांदा उत्पादनाचा पर्याय गांभीर्याने विचारात घ्यावा, अशी सूचना लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती तथा कांदा धोरण समितीच्या सदस्य सुवर्णा जगताप यांनी केले आहे.

राज्यातील कांद्याच्या बाजारभावात स्थिरता राखण्यासाठी आणि शेतकरी, ग्राहक व व्यापाऱ्यांचे समतोल हित साधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या कांदा धोरण समितीची बैठक नुकतीच राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात झाली. अध्यक्षस्थानी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल होते. या बैठकीत कांद्याच्या उत्पादन, साठवणूक, विक्री व्यवस्थापन, निर्यात धोरण आणि भाव नियंत्रणाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत जगताप यांनी उपरोक्त सूचना मांडली. या बैठकीस कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कांदा व्यापाराशी संबंधित संस्था, शेतकरी प्रतिनिधी आणि कांदा निर्यातदार उपस्थित होते.

Comments are closed.