NGN News
Latest Marathi News

‘जयहिंद’ची पर्यावरणपूरक सेवा; सप्तशृंगी गडाचे 55 हेक्टर क्षेत्र हिरवाईने नटले !

  • 55 हजार वृक्षांचे रोपण, संगोपन
  • शासन, नाशिक एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट, स्थानिक ग्रामपंचायतही सहभागी

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्त्वाच्या असलेल्या सप्तशृंगी गडावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद लोक चळवळीच्या वतीने 55 हजार देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले असून सप्तशृंगी मातेला जयहिंदच्या वतीने नवरात्रनिमित्त पर्यावरण पूरक सेवा अर्पण करण्यात आली आहे.

वणी येथील सप्तशृंगी गडावर महाराष्ट्र शासन, नाशिक एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि जय हिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने 55 हेक्टर क्षेत्रामध्ये 55 हजार देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. सप्तशृंगी गडावर भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी असून नवरात्रीच्या काळामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. हा डोंगर परिसर हिरवाईने नटावा निसर्ग संपन्न व्हावा याकरता जय हिंद लोक चळवळीने पुढाकार घेतला असून सप्तशृंगी गडावरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले असून याच्या संगोपनाची जबाबदारी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टने घेतली आहे. यामध्ये पिंपळ, उंबर, लिंब, वड, याचबरोबर औषधी वनस्पतींचाही समावेश आहे.

सप्तशृंगी गडाच्या चारही बाजूने महाराष्ट्र शासनाचा वन विभाग व जय हिंद च्या वतीने चर खोदाई करून शास्त्रोक्त पद्धतीने या वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे याचबरोबर पाण्याची व्यवस्था व्हावी याकरता ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्यात आले आहे तसेच वृक्षांच्या रक्षणाकरता सेवाभावी पद्धतीने वृक्षारक्षकाची नियुक्ती ही करण्यात आली आहे. या कामी ग्रामपंचायत ही मोठे सहकार्य लाभले आहे. दंडकारण्य अभियानाचे समन्वयक प्राचार्य दशरथ वर्पे म्हणाले की स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे वृक्षारोपण व संगोपन होत असून येणाऱ्या दोन तीन वर्षांमध्ये हा परिसर आणखी हिरवा होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

———

@ थोरस्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सजीव सृष्टीच्या रक्षणाकरता दंडकारण्य अभियान ही पर्यावरण चळवळ सुरू केली. या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील उघड्या बोडक्या डोंगरांवर कोट्यवधी बियांचे रोपण करण्यात आले असून लाखो वृक्षांची रोपण झाले आहे यामुळे तालुक्यात हिरवाई वाढली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही पर्यावरण चळवळ सह्याद्री ते सातपुडा पोहोचली असून एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या पुढाकारातून सप्तशृंगी गडावर वृक्षारोपण करण्यात आले आहे.

  • डॉ. सुधीर तांबे, जयहिंद चे संस्थापक तथा माजी आमदार

Comments are closed.