NGN News
Latest Marathi News

कष्टकरी संघटनेचा ‘एल्गार’; बालविकास प्रकल्प अधिकारी दालनात भरवली अंगणवाडी

  • पोषण आहारापासून वंचित ठेवल्याने उचलले पाऊल

** वाल्मिक गवांदे

इगतपुरी । एनजीएन न्यूज नेटवर्क

इगतपूरी तालुक्यातील कुरुंगवाडी पैकी मारुतीवाडी या ठिकाणी लहान बालकांना पोषण आहार मिळत नाही. यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा तक्रार करूनही पोषण आहार न मिळाल्याने अखेर बुधवारी ( दि. २४ ) एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या बाल प्रकल्प अधिकारी यांच्या दालनातच महिलांनी आपल्या लहान सोबत आणून बालवाडी भरवून आंदोलन केले.

गेल्या वर्ष भरापासून सदर मुलांना आहारच मिळाला नाही मात्र ऑनलाईन आहार वाटपाची नोंद होत असल्याने हा आहार कोणाच्या पोटात जातो असा प्रश्न भगवान मधे यांनी उपस्थित केला आहे. मारुतीवडी येथे एकूण ३० पेक्षा जास्त आदिवासी कुटुंब राहतात. मारुतीवाडी येथे अंगणवाडी नसल्याने तेथील लहान बालके यांची नोंद कुरंगवाडी येथील गावात आहे. मारुतीवाडी ते कुरुंगवाडीचे अंतर तीन किमीचे असल्यामुळे ३ ते ६ वयोगटातील मुले हा आहार घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रात जात नाही. अंतर दूरचे असल्याने आणि सर्व परिसर हा फॉरेस्ट असल्याने बिबट्या सारख्या प्राण्यांची भीती आहे. मारुतीवाडी या ठिकाणी ३५ मुले यांना आहार वाटप केला जात नाही. याबाबत अनेकदा CDPO इगतपुरी यांच्याकडे एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने तक्रार केली. मात्र अद्यापही सदर बालकांना पोषण आहार वाटप केला गेला नसुन काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या दालनात बालवाडी भरवुन आंदोलन केले आहे. पोषण आहारापासुन वंचित ठेवणाऱ्या बाल प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी केली आहे.

सकाळपासून सुरु असलेल्या या आंदोलन कर्त्यांना पोषण आहार नियमित पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात सुरेखा मधे, गणपत गावंडा, काळू निरगुडे, मथुरा भगत, राजू भगत, राजू मेंगाळ, शिवाजी सावंत, हनुमंत सराई, संजय पारधी, कविता खडके, सुनबाई पोकळे, हौसाबाई तेलम, मीराबाई वारे, बुगाबाई गंगाड, दिपबाई झुगरे आदी महिला लहान बालकांना घेऊन सहभागी झाल्या होत्या.

Comments are closed.