NGN News
Latest Marathi News

लासलगाव परिसरात अतिवृष्टी; भुजबळ उद्या कोटमगाव-वनसगावात पाहणीला

लासलगाव : राकेश बोरा

निफाड तालुक्यातील कोटमगाव, वनसगाव, ब्राह्मणगाव विंचूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मका, टोमॅटो, कांदा, यांसह शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र चोवीस तास उलटूनही महसूल व कृषी विभागाने पंचनामे सुरू न केल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे उद्या ( दि. 25) कोटमगाव व वनसगाव परिसरातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नुकसानीबाबत बोलताना स्थानिक शेतकरी म्हणाले, “आमचे मका, टोमॅटो आणि कांद्याचे पीक पूर्णपणे पाण्यात गेले आहे. लाखोंचे नुकसान झाले, पण पंचनाम्यासाठी कोणी आलेले नाही. निफाड-येवला तालुक्यात प्रचंड प्रमाणात झालेल्या या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून भुजबळ यांच्या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Comments are closed.